तापी, वाघुर नदीवरील पुलांची कामे होणार सुरू, राज्यमंत्री पाटील यांचा पाठपुरावा

15


सामना प्रतिनिधी, जळगाव

20 वर्षांपासून नागरिकांची सातत्याने असलेली मागणी विचारात घेऊन जळगाव-भुसावळ आणि यावल या 3 तालुक्यांना जोडणाऱ्या तापी व वाघुर नदीवरील 2 मोठय़ा पुलांच्या कामांना प्रत्यक्ष लवकरच सुरुवात केली जाणार आहे. सुमारे 70 कोटी रुपयांचा निधी खर्चून हे काम मार्गी लागणार आहे. शिवसेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा करून केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांतील अंतर कमी होणार आहे.

तापी नदीवर शेळगाव बंधारा, मध्यम प्रकल्पाच्या कामाला 1997 – 98 मध्ये तत्कालीन शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, याकडे जलसंपदा विभाग हाती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दुर्लक्ष केले. शेळगाव मध्यम प्रकल्पाच्या कामाला विद्यमान युती सरकारच्या काळात सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. शेळगाव बॅरेज प्रकल्पासाठी 620 कोटी 58 लाख रुपयांच्या कामांमधून 70 कोटी रुपयांचा निधी पुलासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. जळगाव व यावल तालुक्यांना जोडणाऱ्या शेळगाव-बामणोद या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याकरील शेळगाव गावाजवळ उंच पुलाच्या कामासाठी 49 कोटी 72 लाख 35 हजार 88 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जळगाव व भुसावळ तालुक्यांना जोडणाऱया वाघुर नदीवरील वडगाव – जोगलखेडा उंच पुलाच्या कामासाठी 21 कोटी 30 लाख 96 हजार 228 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वडगाव-जोगलखेडा उंच पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, कार्यारंभ आदेश लवकरच तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून देण्यात येणार आहेत. शेळगाव- बामणोद रस्त्यावरील पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या दोन पुलांच्या कामांमुळे तब्बल 40 ते 45 गावांतील नागरिकांना लाभ होणार असून, जळगाव, यावल व भुसावळ या तालुक्यांतील गावांमधील अंतर जवळपास 20 कि.मी.ने कमी होणार आहे. सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी या 2 पुलांचे काम मार्गी लागण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळ व शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार बंधाऱ्याच्या कामात या पुलांच्या निर्मितीचाही समावेश करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या