तोतया पोलीस अखेर गजाआड, ताडदेव – वरळी पोलिसांची कारवाई


सामना ऑनलाईन । मुंबई

पोलीस असल्याची बतावणी करून महिलांची फसवणूक करणाऱ्याला ताडदेव आणि वरळी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली. अमजदअली अकबरअली बेग असे त्याचे नाव आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहेत. अमजद हा भिवंडीच्या शांतीनगर परिसरात राहतो. त्याने ताडदेव येथील एका महिलेकडून 90 हजार रुपये आणि वरळी येथे एका महिलेचे 22 तोळे सोने घेऊन पळ काढला होता. या दोन्ही घटनांचे गांभीर्य पाहता त्याच्या अटकेकरिता पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

परिमंडळ-3 चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ताडदेवचे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे आणि वरळीचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वर्पे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पडवळे, अभिषेक टेकवडे, उपनिरीक्षक गोडसे यांच्या पथकाने तपास सुरू केला. अमजद हा फसवणूक केल्यानंतर मुंबईबाहेर पळून गेला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. तो पुन्हा भिवंडी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. त्याला वरळी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या गुह्यात त्याला ताडदेव पोलिसांनीही अटक केली.