तात्या ठाकूरदेसाई

दुर्गेश आखाडे

हिंदी भाषेच्या प्रसारासाठी काम करणारे आणि हिंदीचे जाणकार अशी ओळख असलेले रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलचे आधारस्तंभ अशी दत्तात्रय उर्फ तात्या ठाकूरदेसाई यांची ओळख होती. नुकतेच  त्यांचे निधन झाले. पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी ज्ञानदानाचे काम करताना अनेक विद्यार्थी आणि सहकारी शिक्षकांना घडवले. त्यांनी हिंदी भाषेच्या प्रसारासाठी खूप मोठे काम केले. तत्कालीन राष्ट्रपती कृष्णकांत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. ठाकूरदेसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळविले. त्यामध्ये १९७७-७८ ला रत्नागिरीचा आदर्श पुरस्कार, १९८३ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीचे ते सदस्य होते. १९३६ ते १९८६ पर्यंत त्यांनी भारत स्काऊट गाइड संघटनेचे काम पाहिले. महाराष्ट्र राष्ट्रभाषा, पुणे या संस्थेच्या नियामक तसेच कार्यकारी मंडळावर ते सहा वर्षे कार्यरत होते. परीक्षक, समालोचक अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. अशा अनेक शैक्षणिक संघटना आणि मंडळांवर ठाकूरदेसाई यांनी यशस्वीपणे काम केले. महाराष्ट्र विद्यापीठाचे केंद्रप्रमुख, हिंदी शिक्षक सनद परीक्षावर्ग, लोकन्यायालय रत्नागिरी जिल्हा पॅनल सदस्य, गुरुवर्य अ. आ. देसाई पुरस्कार परीक्षण समिती सदस्य, शासकीय अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंडळावर सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राष्ट्रीय भाषा प्रबोध हिंदी एकांकी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मंडळाद्वारे प्रकाशित इयत्ता आठवीच्या संपूर्ण हिंदीच्या पाठय़पुस्तकाच्या संपादनाचे काम त्यांनी पाहिले. तात्या ठाकूरदेसाई शिक्षणाबरोबर उत्तम क्रीडापटू आणि रंगकर्मीदेखील होते. १९९७ मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था स्थापन केली. कबड्डी आणि ब्रिज स्पर्धांमध्ये ते सहभाग घेत असत. त्यांच्या जाण्याने हिंदीचा सच्चा प्रसारक निघून गेला आहे.