कर्जत अतिक्रमण प्रकरण, शेख मृत्यू प्रकरणी 4 ते 5 जणांवर ठपका?

suicide-1

सामना प्रतिनिधी । नगर

कर्जत येथील तौसिफ शेख या युवकाच्या आत्महत्या प्रकरणा संदर्भात नेमण्यात आलेल्या सतिमीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल झाला आहे. यामध्ये चार ते पाच जणांवर ठपकाही ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या आधारे दिली जात आहे. मात्र अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांनी संबंधीत प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिली जाईल असे स्पष्ट केले.

कर्जत शहरामध्ये दावल मलिक या धार्मिक ट्रस्टच्या भुखंडावर गाळेधारकांनी अतिक्रण केले ते हटवण्यासाठी तौसिप शेख यांनी 28 जुन रोजी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण केले. 20 ऑगस्ट रोजी पुन्हा अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने आश्‍वासन दिले. मात्र कोणतीच कारवाई न झाल्यामुळे 10 डिसेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा शेख यांनी दिला होता. 20 डिसेंबर रोजी त्यांनी आत्महदन केले व दुसर्‍या दिवशी त्यांचा या घटनेत मृत्यू झाला.

या घटनेनंतर प्रशासकीय पातळीवर चांगलीच खळबळ उडाली शेख यांच्याकडे वेळीच लक्ष का दिले नाही, अतिक्रमण होते तर शेख यांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वच अतिक्रमण उद्ध्वस्त कसे झाले यासह एक ना अनेक प्रश्‍न निर्माण झाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शेख कुटुंबीयांनी केली होती. या घटनेला महिना उलटला गेला आहे.
शेख यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच वरिष्ठ अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली होती. या समितीने या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन आलेले सर्व मुद्दे व आलेल्या तक्रारी या बाबत सुद्धा तपासणी केली व त्या सर्व बाबींचा अहवाल तयार करून त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सादर केला आहे.

या प्रकरणामध्ये चार ते पाच जणांवर ठपकाही ठेवण्यात आला आहे. मात्र या संदर्भातील माहिती देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असून नेमके कोणाला दोषी धरले आहे हे मात्र उघड केले नाही. त्यामुळे चौकशी अहवालात अन्य काही बाबींचा काही उल्लेख आहे का? याचाही खुलासा होणे गरजेचे आहे.