मेट्रोच्या ‘टीबीएम’चा स्पीड जुन्या इमारतींजवळ मंदावणार

सामना ऑनलाईन । मुंबई

मेट्रो रेल्वे लाइन ३ साठी मुंबईच्या तळाशी असलेल्या कठीण खडकातून भुयारी मार्ग बनवण्यास आज सुरुवात झाली. महाकाय टनेल बोअरिंग मशीनच्यात (टीबीएम) सहाय्याने माहीमच्या नयानगर येथून या कामाला सुरुवात झाली. रोज आठ-दहा मीटर भुयार खोदण्याचे लक्ष्य ठेवले गेले असले तरी जुन्या इमारतींच्या मार्गावर मात्र या मशीनचा वेग मंदावणार आहे. जमिनीच्या व्हायब्रेशन लेव्हलनुसार मशीनचा वेग कमी जास्त केला जाणार आहे.

मेट्रो रेल्वे लाइन ३ साठी जमिनीपासून २५ मीटर खोलीवरून भुयारी मार्ग बनवण्यास सुरुवात झाली. माहीम नयानगर येथून दोन भुयारी मार्ग बनवण्यात येत आहेत. त्यासाठी लावण्यात आलेल्या दोन टीबीएम मशीनपैकी एक आज सुरू करण्यात आली. माहीमपासून अडीच किलोमीटर दादरपर्यंत ही भुयारे बनवली जाणार आहेत. दर दिवशी आठ-दहा मीटरइतके भुयार बनवले जाणार आहे.

मेट्रोसाठी भुयारे खोदताना जमिनीला कंपने (व्हायब्रेशन) बसणार आहेत. त्यामुळे जुन्या इमारतींना धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने (एमएमआरसी) मेट्रोच्या मार्गावरील जुन्या इमारतींचे सर्व्हेक्षण केले असून या इमारतींजवळून टीबीएम मशीन जाईल तेव्हा कंपनांच्या लेव्हलनुसार टीबीएमचा स्पीड नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात आल्याची माहिती यावेळी एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली.

मुंबईत सात ठिकाणी मेट्रोच्या भुयारी मार्गासाठी टीबीएम मशीन्स लावली जाणार आहेत. त्यासाठी एकूण १७ टीबीएम मशीन्स मागवण्यात आल्या आहेत. ४ मशीन्स मुंबईत पोहोचल्या असून ६ मशीन्स मार्गात आहेत. उर्वरित ७ मशीन्स फेब्रुवारी २०१८ पर्यंत पोहोचतील, असेही त्यांनी सांगितले.