प्राध्यापक… शिक्षक…

teacher
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

विद्यादानासारखे पवित्र कार्य नाही. प्राध्यापक किंवा शिक्षकी पेशा हा समाजात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यात शिक्षकांचा वाटा मोठा असतो. शिकवणे हा फक्त एक ‘करीअर ऑप्शन’ नाही तर शिक्षण व्यवस्थेत सहभागी होऊन देशाच्या भवितव्याला आकार देण्याची संधीही याद्वारे मिळते. महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन करणे हे आपल्या देशातील अनेक उत्तम करीअरपैकी एक करीअर आहे.

स्थिरता, नोकरीत सुरक्षितता, उत्तम पगाराबरोबरच उत्तम सामाजिक सन्मानही या करीअरमध्ये मिळतो. विशेषतः सातत्याने तरुण पिढीबरोबर राहण्याची संधीही मिळते. त्यामुळे जगातील नवनवीन बदलही लक्षात येऊन ते कसे स्वीकारावेत याची माहितीही होते. इतरांच्या भविष्याला आकार देणारं आणि विद्यार्थ्यांबरोबर स्वतःचीही बुद्धिमत्ता विकसित करणारं कॉलेज प्राध्यापकाचे करीअर आहे.

पूर्वी पोस्ट ग्रॅज्युएट होणं हे कॉलेज लेक्चररकरिता आवश्यक होतं. मात्र आता या पदासाठीची निवड प्रक्रिया आव्हानात्मक आहे. प्राध्यापक होण्यासाठी तुम्हाला पीएचडी पदवी आणि शिक्षण क्षेत्रातला अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतर अनुभव, वरिष्ठता आणि आपलं शिकवण्याचं कौशल्य या आधारावर प्रथम असिस्टंट प्रोफेसर आणि नंतर प्रोफेसर पदाकरिता पात्र ठरवण्यात येते.

प्राध्यापकाचे आवश्यक गुण
– जे विषय शिकवणार त्यावर प्रभुत्व हवे. प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी निवडलेले विषय विद्यार्थ्यांना समजवून देण्याचं कौशल्य त्याच्याकडे हवं.
– मानसशास्त्राचे ज्ञान हवे. विशेषतः बाल, कुमार आणि किशोरवयीन मुला-मुलींचे मानसशास्त्र शिक्षकाला अवगत हवे.
– शाळा किंवा महाविद्यालय कुठेही शिकवणाऱ्या शिक्षकांत नेतृत्वगुण असायला हवा किंवा त्याने तो स्वतःमध्ये विकसित करावा. कारण तो विद्यार्थ्यांचा नेता किंवा मित्रही असतो.
– विद्यार्थ्यांविषयी आस्था, प्रेम, सहानुभूती असणारा शिक्षक उत्तम हा उत्तम शिक्षक होऊ शकतो.
– कोणत्याही प्राध्यापक किंवा शिक्षकाला विद्यार्थी, सहव्यवसायी, संचालक यांच्याबरोबर काम करायचे असते. त्यांचा समाजाशी जवळचा संबंध येतो. या सर्वांशी वागण्याचे ज्ञान आणि कला त्याच्याजवळ असायला हवी.

शिक्षण
– पोस्ट ग्रॅज्युएशननंतर लगेच युजीसी नेट परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा किंवा एमफील वा पीएचडी पदवी प्राप्त करण्याकरिता आपल्या ठरवलेल्या विषयातील रिसर्चकरिता अर्ज करा.
– जो विषय अधिकाधिक चांगल्या प्रकारे शिकवू शकता, ज्या विषयाची आवड आहे त्याच विषयाची निवड करा. शिकवण्यासाठी निवडलेल्या प्रमुख विषयांची रचना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
– भविष्यात तुम्हाला जे विषय शिकवायचे आहेत त्या विषयांचा पाया भक्कम करा.

यूजीसी म्हणजे काय ?
यूजीसी नेट परीक्षा म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (विश्वविद्यालय अनुदान आयोग) ही राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणारी परीक्षा आहे. सरकारी महाविद्यालय प्राध्यापक पदाकरिता शिक्षकांची निवड करण्याकरिता ही परीक्षा देणे महत्त्वाचे असते. वर्षभरात जून आणि सप्टेंबर हे दोन महिने या परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेच्या माध्यमातून लेक्टररशिप, ज्युनियर रिसर्च फेलोशिपकरिता उमेदवारांची निवड करण्यात येते.

यूजीसी परीक्षार्थींसाठी...
ओबीसी वर्गासाठी कमीत कमी ५५ टक्के गुणांसह पोस्ट ग्र्रॅज्युएशन पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. या पदाकरिता कोणतीही वयोमर्यादा नाही.
असे मिळणार वेतन…
पीएचडी पदवी, प्रतिष्ठत महाविद्यालयात १० वर्षांपेक्षा जास्त वर्षे अध्यापक असणाऱ्यांना किंवा प्रसिद्ध महाविद्यालयात रिसर्च करणाऱ्या प्राध्यापकांना असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी १५००० ते ३९,००० रुपये वेतन मिळू शकते.