टल्ली होऊन शिकवणे हा तर संस्कृतीचाच एक भाग…शिक्षिकेचा अजब दावा

प्रतिकात्मक फोटो

सामना ऑनलाईन। बस्तर

छत्तीसगड मधील बस्तर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षिका मद्य पिऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे याबद्दल शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी तिला जाब विचारताच तिने टल्ली होऊन शिकवणे हा तर संस्कृतीचाच एक भाग असल्याचे अजब उत्तर दिले. यामुळे चक्रावलेल्या अधिकाऱ्यांनी तिला तात्काळ निलंबित करा अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. फुलेश्वरी असं या शिक्षिकेचे नाव आहे.

सरकारी शाळांमधील शैक्षणिक दर्जाच्या पाहणीसाठी काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे एक पथक पूर्वसूचना न देता येथील सरकारी शाळेत गेले होते. त्यावेळी एका वर्गात शिक्षिका मुलांना बोबडे बोलत शिकवत असल्याचे व वर्गात मद्याचा दुर्गंध येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी मद्यप्राशन केले असावे असे अधिकाऱ्यांना वाटले. पण नंतर शिक्षिकाच टल्ली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांचे भवितव्य ज्या शिक्षिकेच्या हाती आहे तिचे असे गैरजबाबदार वर्तन बघून अधिकारी हैराण झाले. त्यांनी ताबडतोब मुख्याध्यापकांना याबद्दल विचारले. त्यावर संबंधित शिक्षिकेला जाब विचारला तर ती शाळेत गोंधळ घालते. यामुळे शाळेची नाचक्की होत असल्याने कोणीच तिच्या वाटेला जात नाही. असे उत्तर मुख्याध्यापकांनी दिले.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी शिक्षिकेलाच थेट जाब विचारला. त्यावर अंत्यत शांतपणे तिने जे उत्तर दिले ते ऐकून अधिकाऱ्यांना हसावे की रडावे हेच कळत नव्हते. ती म्हणाली ”मद्य पिणं ही आमची संस्कृती आहे आणि मद्य पिऊन शिकवणं हा त्याच संस्कृतीचाच एक भाग आहे. छत्तीसगड सरकारने आदिवासींना पाच लीटर दारुची निर्मिती घरात करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे शाळेत टल्ली होऊन शिकवण्यात गैर काय?” फुलेश्वरीचे हे उत्तर ऐकून अधिकाऱ्यांनी तिला समज दिली. त्यानंतर या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली व त्यात संबंधित शिक्षिकेला कामावरून काढणे आवश्यक असल्याचे सांगितले.
दरम्यान छत्तीसगडमध्ये महिलांनी मद्यप्राशन करणे ही सामान्य बाब आहे. अबकारी विभागानुसार गेल्या आठ महिन्यात छत्तीसगडमध्ये नागरिक ५०० कोटी रुपयांहूनही अधिक किमतीची दारू प्यायले आहेत.
.