शिक्षकाने केला सहकारी शिक्षकाचा खून

इमरान अनू नवरंगाबादे

सामना ऑनलाईन । यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धामणगावदेव येथील आश्रमशाळेत एका शिक्षकाचा सहकारी शिक्षकानेच खून करून प्रेत पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी शिक्षकाने स्वत:हून मानोरा पोलीस ठाणे गाठून या खुनाची कबुली देत प्रेत शेतात पुरल्याचे पोलिसांना सांगितले.

इमरान अनू नवरंगाबादे (३४) असे मृत शिक्षकाचे नाव असून गोपाल गजाधरसिंग ठाकूर (३३) याने त्यांची हत्या केली आहे. हे दोघेही दारव्हा तालुक्यातील धामणगावदेव येथील महात्मा मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळेत गेल्या १२ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. इमरान २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घरुन दारव्हा येथे जाण्यासाठी निघाला होता. परंतु तो सायंकाळी परत आला नाही. पत्नीने त्याला रात्री ९ वाजता फोन केला. तेव्हा अर्ध्या तासात परत येतो असे सांगितले. मात्र तो परत आलाच नाही. दुसऱ्या दिवशी फोनही उचलला जात नव्हता. त्यानंतर वडिलांनी इमरान बेपत्ता असल्याची तक्रार दिग्रस पोलीस ठाण्यात दाखल केली.

दरम्यान, बुधवारी सकाळी याच शाळेतील शिक्षक गोपाल गजाधरसिंग ठाकूर हा थेट मानोरा पोलीस ठाण्यात पोहोचला व त्याने इमरानची हत्या केल्याची कबूली पोलिसांकडे दिली. पोलिसांनी हत्येचे कारण विचारले असता गोपालने काहीही सांगितले नसल्याचे समजते.

स्वत:च्याच शेतात पुरले प्रेत
आरोपी गोपाल ठाकूर याने इमरानचे प्रेत आपल्या शेतात पुरुन ठेवल्याचीही कबुली पोलिसांपुढे दिली. पोलिसांनी त्याला घेऊन थेट दारव्हा-मानोरा मार्गावरील चिस्ताळा येथील शेत गाठले. त्या ठिकाणी शेतातील विहिरीत बांधकामासाठी असलेल्या खड्ड्यात पुरलेले इमरानचे प्रेत आढळून आले. इमरान आणि गोपाल हे दोघे जीवलग मित्र होते, एकाच शाळेवर १२ वर्षांपासून कार्यरत होते. त्यामुळे खून कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहे.