दुष्काळाचा फटका शिक्षक भरतीला


सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील दुष्काळी स्थितीचा फटका शिक्षक भरतीला बसला असून एकूण रिक्त पदांपैकी फक्त निम्मी म्हणजेच 50 टक्के पदे भरण्यास शालेय शिक्षण विभागाने नुकतीच परवानगी दिली आहे. यापूर्वी एकूण रिक्त पदांपैकी 75 टक्के पदे भरण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र आता राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक बोजा वाढल्याने शिक्षक भरतीचे प्रमाण 75 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर आणण्यात आले आहे.

राज्यात शिक्षकांची सुमारे 25 हजार पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या वेतनावरील खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. शिक्षक आणि अन्य संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या 75 टक्के प्रमाणात पदे भरण्यास पूर्वी परवानगी दिली होती. पण आता दुष्काळामुळे ही मर्यादा 50 टक्के करण्यात आली आहे. याविषयीचा शासन अध्यादेश नुकताच जाहीर झाला आहे. ही भरती प्रक्रिया राबविताना यंदा प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे एकत्र भरण्यात येणार आहे. ही शिक्षक भरती ‘पवित्र’ पोर्टलवरून केली जाणार असून अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण असणाऱया उमेदवारांना शिक्षकाची नोकरी मिळणार आहे.

अशी होणार शिक्षक भरती

  • उच्च माध्यमिक शाळांमध्ये तुकडी निहाय मंजूर शिक्षकांची पदे न भरता विषयाशी संबंधित शिक्षक भरती करावी.
  •  दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत नवीन पदे भरण्यात येऊ नयेत.
  • 200 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये गट प्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पदासाठी निकषानुसार 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे भरावीत.