मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; माटेफळ येथील शिक्षकाने घेतला गळफास

सामना प्रतिनिधी । मुरुड

मुरुड येथून जवळच असलेल्या माटेफळ येथील मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट शाळा, निवळी या शाळेत शिक्षक असलेल्या रमेश ज्ञानोबा पाटील यांनी गळफास घेऊन मराठा आरक्षणासाठी आपले जीवन संपवले.

मयत रमेश ज्ञानोबा पाटील (५०) मु.पो. माटेफळ, ता.जि.लातूर मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट शाळा, निवळी येथे शिक्षक होते. रमेश पाटील यांनी चिठ्ठीमध्ये कर्जाचा डोंगर उभा राहिल्यामुळे मी निराश होऊन आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. माझी मुलगी एमएस्सीला विद्यापीठातून दुसरी व लातूर जिल्ह्यातून पहिली आली आहे. पण आरक्षण नसल्यामुळे माझ्या तिन्ही मुलांना नोकरी नाही. माझ्या एकट्याच्या पगारावर संसाराचा गाडा चालत नसल्यामुळे व माझ्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्यामुळे मी निराश होऊन आत्महत्या करीत आहे. तुम्हीच विचार करा शिक्षण म्हणजे काय आहे. माझ्या पाठीमागे शासनाने माझ्या पत्नीला संसाराचा गाडा ओढण्यासाठी पेन्शन लवकर चालू करावी, असे निराश होऊन रमेश पाटील यांनी चिठ्ठीतून शासनाला सांगितले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रसंगी मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.