आज मतदान; शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक होणार चुरशीची

सामना प्रतिनिधी । मुंबई / ठाणे

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ या चार जागांसाठी उद्या सोमवारी निवडणूक होणार आहे. अत्यंत चुरशीची असलेल्या या निवडणुकीत चारही मतदारसंघांतील एकूण ५२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. या निवडणुकीसाठी २ लाख ३८ हजार ९३३ मतदार मतपत्रिकेद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतपत्रिकेवर शिक्का मारण्याऐवजी निवडणूक आयोगाने दिलेल्या पेनानेच पहिल्या पसंतीचे मत द्यावे लागणार आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेकडून विलास पोतनीस हे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात अॅड. अमितकुमार मेहता, शेकापचे उमेदवार राजेंद्र दराडे हे निवडणूक लढवत आहेत. कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्याविरोधात भाजपने राष्ट्रवादीतून आयात केलेले उमेदवार निरंजन डावखरे तर राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला हे निवडणूक लढवत आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघात १० उमेदवार निवडणूक लढवत असून शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्याविरोधात लोकभारतीचे कपिल पाटील, भाजपपुरस्कृत अनिल देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे यांच्याविरोधात भाजपचे अनिकेत पाटील, माजी खासदार प्रताप सोनवणे आणि संदीप बेडसे यांच्यात लढत रंगणार आहे.

सकाळी ७ ते सायंकाळी ५

या चारही मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मतदारांना सकाळी ७ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सायंकाळी पाचनंतर जे मतदार मतदान केंद्राच्या बाहेर रांगेत असतील त्यांनाही मतदान करता येईल.

मतदान केंद्रे
कोकण
पदवीधर – १५७
ठाणे जिल्हा – ५६
पालघर जिल्हा – २०
रायगड जिल्हा – ३६
रत्नागिरी जिल्हा – २६
सिंधुदुर्ग – १९
मुंबई पदवीधर – ७८
मुंबई शहर – १८
मुंबई उपनगर- ६०
मुंबई शिक्षक – ३६
मुंबई शहर – १०
मुंबई उपनगर – २६
उमेदवार रिंगणात
कोकण पदवीधर – १४
मुंबई पदवीधर – १२
मुंबई शिक्षक – १०
नाशिक शिक्षक – १६

शिवसेनेचे शिलेदार

किलास पोतनीस
मुंबई पदवीधर

संजय मोरे
कोकण पदवीधर

शिवाजी शेंडगे
मुंबई शिक्षक

किशोर दराडे
नाशिक शिक्षक

सावधान… तर मतपत्रिका बाद होईल

मतपत्रिकेत जितके उमेदवार आहेत तितके पसंती क्रमांक मतदारांना नोंदवता येतील, पण पहिल्या पसंतीचे मत नोंदवावेच लागेल. मत नोंदवताना निवडणूक आयोगाने दिलेला पेनच मतदारांना वापरावा लागेल. स्वतःच्या पेनाने पसंती क्रमांक नोंदवला तर मतपत्रिका बाद ठरेल. नोटाचा पर्यायही मतपत्रिकेत आहे. नोटाला पहिली पसंती दिली तरी मतपत्रिका वैध ठरेल.

मतदानाला जाताना

ओळखपत्रांच्या एकूण १३ पैकी एक पुरावा सादर करून मतदान करता येईल.

मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहनचालक परवाना, शिधापत्रिका, शासकीय कार्यालयातून मिळालेला रहिवासी दाखला, छायाचित्र असलेले बँक पासबुक, छायाचित्र असलेले जातप्रमाणपत्र, छायाचित्र असलेले शासकीय दाखले, शस्त्र परवाना, पासपोर्ट, पेन्शन पुस्तिका, छायाचित्र असलेले मालमत्तेचे दस्तावेज

आज शाळा, कॉलेज बंद

शिक्षक मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये बंद राहणार आहेत.