मोठी बातमी : धवन लवकर पुनरागमन करणार, प्रशिक्षकांनी दिले शुभ संकेत

63

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शिखर धवन आता वर्ल्डकपमध्ये दिसणार की नाही याबाबत शंका व्यक्त होत असतानाच एक चांगली बातमी आली आहे. हिंदुस्थानचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी धवन 10 ते 12 दिवसात बरा होऊन संघात पुनरागमन करेल असे म्हणत क्रीडाप्रेमींना गोड बातमी दिली.

‘आम्ही शिखर धवनच्या दुखापतीकडे लक्ष ठेवून आहोत. त्याला ठिक होण्यासाठी 10 ते 12 दिवस लागू शकतात. जर गरज भासली तर आमच्याकडे विजय शंकरचा पर्याय आहे. बॅकअपसाठीही आम्ही तयार असून ऋषभ पंत उपलब्ध आहे, असे संजय बांगर म्हणाले. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या आशा उंचावल्या आहेत.

उद्या गुरुवारी ट्रेंट ब्रिजमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या लढतीपूर्वी टीम इंडियाने बुधवारी कसून सराव केला. या सरावाच्या दरम्यान इतर खेळाडूंसोबत शिखर धवनही मैदानात आला. शिखरने सराव केला नसला तरी प्रशिक्षकांनी दिलेल्या संकेतामुळे तो लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसेल अशी आशा आहे.

याआधी पहिल्या दोन लढतीत विजय मिळवून वर्ल्डकपची दणक्यात सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला रविवारी मोठा धक्का बसला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करून विजय मिळवून देणारा शिखर धवन बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी संघाबाहेर फेकला गेला. यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला इंग्लंडमध्ये बोलावून घेण्यात आले. त्यामुळे आता शिखर वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसणार नाही अशीच शक्यता होती. परंतु सध्या त्याच्या दुखापतीवर उपचार सुरू असून लवकरच तो संघात पुररागमन करेल.

आपली प्रतिक्रिया द्या