टीम इंडियाचा न्युझीलंडवर पहिला टी-२० विजय

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टी-२० क्रिकेटचे सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱया न्यूझीलंडला आज टीम इंडियाने मोठा दणका देत फिरोजशहा कोटलावरील पहिली टी-२० लढत ५३ धावांनी जिंकली व तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. गेल्या सहा आंतरराष्ट्रीय टी-२० लढतींतील हिंदुस्थानचा किवींविरुद्धचा पहिलाच ऐतिहासिक विजय आहे. हिंदुस्थानी सलामीवीर रोहित शर्मा (५५ चेंडूंत ८०) व शिखर धवन (५२ चेंडूंत ८०) यांनी ९८ चेंडूंत १५८ धावांची विक्रमी सलामी रचत टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. त्यावर हिंदुस्थानी गोलंदाजांनी कळस रचत न्यूझीलंडविरुद्ध टी-२० विजयाचा दुष्काळ संपवला. या विजयाने हिंदुस्थानी संघाने क्रिकेटचा निरोप घेणारा आपला ज्येष्ठ वेगवान गोलंदाज आशीष नेहराचे विजयी फेअरवेल साजरे केले.

यजमान हिंदुस्थानच्या २०३ धावांच्या मोठय़ा आव्हानाच्या दबावाखाली न्यूझीलंडचे फलंदाज डावाच्या सुरुवातीपासूनच लडखडताना दिसले. सलामीवीर मार्टिन गप्टील (४), कॉलीन मुन्रो (७), कर्णधार केन विलियम्स (२८), टॉम ब्रुस (१०), कॉलीन डी ग्रॅण्डहोम (१०) व टॉम लॅथम (३९) यांनी १३व्या षटकांतच शरणागती पत्करून पॅव्हेलियनचा रस्ता धरल्यावर पाहुण्यांचे विजयाच्या आशाच पार मावळल्या. लेगस्पिनर युझवेंद्र चहलने (२६ धावांत २ विकेट) तर डावखुरा फिरकीवीर अक्षर पटेलने (२० धावांत २ विकेट) यांनी वेगवान गोलंदाजांना सुरेख साथ देत संघाचा विजय साकारला.

संक्षिप्त धावसंख्या
हिंदुस्थान २० षटकांत ३ बाद २०२
न्यूझीलंड २० षटकांत ८ बाद १४९

रोहित-शिखर जोडीची स्फोटक शतकी भागीदारी
नाणेफेक जिंकून प्र्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या टीम इंडियाला सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन यांनी १५८ धावांची धडाकेबाज विक्रमी सलामी मिळवून दिली. रोहितने 55 चेंडूंत ८० धावांची बरसात करताना ६ चौकार व ४ षटकार फटकावले. डावखुऱ्या शिखर धवनने ५२ चेंडूंत ८० धावांची खेळी करताना १० चौकार व २ षटकार ठोकले.