अफगाणिस्तानचा खेळ दोन दिवसांतच खल्लास


सामना ऑनलाईन,बंगळुरू

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत नंबर वन स्थानावर असलेल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने पहिलाच सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानचा खेळ दोन दिवसांतच खल्लास करून कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील महाविजयाची नोंद केली. बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २४ फलंदाज बाद झाले. १९०२ सालानंतर झालेला हा विक्रमच. हिंदुस्थानने हा कसोटी सामना एक डाव व २६२ धावांनी खिशात घातला हे विशेष.

मुरली विजय (१०५ धावा), शिखर धवन (१०७ धावा), लोकेश राहुल (५४ धावा), हार्दीक पांड्या (७१ धावा) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने पहिल्या डावात ४७४ धावा तडकावल्या. अफगाणिस्तानकडून यामीन अहमदझायने सर्वाधिक तीन फलंदाज बाद केले. त्यानंतर अफगाणिस्तानने फलंदाजीला सुरुवात केली. पण हिंदुस्थानी गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा पहिला डाव २७.५ षटकांत १०९ धावांमध्ये, तर दुसरा डाव ३८.४ षटकांत १०३ धावांमध्येच गडगडला. रवीचंद्रन अश्विनने कसोटीत पाच फलंदाज, रवींद्र जाडेजाने सहा फलंदाज, उमेश यादव व इशांत शर्माने प्रत्येकी चार फलंदाज बाद केले.

कसोटीत झालेले विक्रम

दोन दिवसांत कसोटी जिंकणारा हिंदुस्थान पहिलाच आशियाई देश ठरला. कसोटीच्या एका दिवसात दोन वेळा सर्वबाद होणारा अफगाणिस्तान हा तिसराच देश ठरलाय. याआधी हिंदुस्थानवर १९५३ साली आणि झिम्बाब्वेवर २००५ व २०१२ साली अशी आपत्ती ओढवली होती.  हिंदुस्थान – अफगाणिस्तान यांच्यामध्ये झालेली कसोटी १७१.२ षटकांमध्ये निकालात निघाली. सर्वात कमी षटकांमध्ये निकाल लागलेली हिंदुस्थानातील ही पहिलीच कसोटी ठरलीय. याआधी हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २००४ साली मुंबईत झालेली कसोटी २०२.१ षटकांत संपली होती.

आम्ही आक्रमक खेळलो – अजिंक्य

अफगाणिस्तानचा संघ पहिलाच कसोटी सामना खेळत होता. आम्ही त्यांचा आदर केला. पण आक्रमक खेळावरच जोर दिला. दयामाया दाखवली नाही, असे स्पष्ट मत हिंदुस्थानी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कोहलीची यो यो टेस्ट

मानेच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या विराट कोहलीने शुक्रवारी यो यो टेस्ट दिली. हिंदुस्थानच्या आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी तो सज्ज होतोय हे यावरून दिसून आले. पण त्याच्या दुखापतीत किती सुधारणा झालीय याबाबत काही सांगण्यात आलेले नाही.