‘आनंदी गोपाळ’चा टीझर पाहिलात का?


सामना ऑनलाईन । मुंबई

असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. पण, हिंदुस्थानात अनेक जणांनी खरा पुरुषार्थ दाखवत स्त्रियांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती महादेव रानडे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अशी अनेक नावं उदाहरणादाखल देता येतील. या नामावळीतलं एक नाव म्हणजे गोपाळराव जोशी.

हिंदुस्थानातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी. झी स्टुडिओज प्रस्तुत आनंदी गोपाळच्या टीझरमध्ये या मनस्वी किंबहुना तऱ्हेवाईक म्हणावे तरीही द्रष्टे असे गोपाळराव जोशी आपल्या भेटीला आले आहेत. पत्नी शिकलेली असावी, मग तिचं कूळ, जात काहीही असो या विचारांनी पछाडलेल्या गोपाळरावांनी हिंदुस्थानी स्त्रीस्वातंत्र्य इतिहासात एक मानाचं पान मिळवलं आहे. टीझरमधूनही त्यांचा तो पुरोगामी स्वभाव दिसून येत आहे. हरहुन्नरी अभिनेता ललित प्रभाकर याने गोपाळराव जोशी यांची भूमिका साकारली आहे. टीझरमधील त्याचं काम पाहून आता ट्रेलरमध्ये काय असणार आणि आनंदीबाई कोण साकारणार याची उत्सुकता चाळवली गेली आहे.

हिंदुस्थानाच्या पहिल्या महिला डॉक्टरची कथा सांगणारा आनंदी गोपाळ हा चित्रपट 15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजची असून या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केलं आहे.

पाहा टीझर-