सोनाली आणि सिद्धार्थ सांगताहेत गुलाबजामची रेसिपी, पाहा टीझर

सामना ऑनलाईन । मुंबई

चौकटीबाहेरच्या चित्रपटांना हाताळणाऱ्या दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी पुन्हा एकदा त्यांचं दिग्दर्शन कौशल्य पणाला लावत प्रेक्षकांच्या भेटीला नव्या चित्रपटाचा टीझर आणला आहे. ‘चांगल्या पदार्थाची पहिली खूण असते त्याचा वास…’ याच ओळीने सुरुवात होणाऱ्या या टीझरमध्ये स्वयंपाकघरात असणारी पदार्थांची रेलचेल पाहायला मिळतेय. स्वयंपाक करताना एखाद्याच्या मनात कोणत्या भावना असतात, मुळात त्याविषयी प्रत्येकाचा दृष्टीकोन कसा असतो, याची झलक या टीझरमधून पाहायला मिळतेय. या टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराच्या लूकवरुन पडदा उचलला नाहीये. पण, तरीही सोनालीच्या आवाजात प्रदर्शित करण्यात आलेला ‘गुलाबजाम’चा टीझर लक्षवेधी ठरतोय.

पाहा टीझर-

कथेतील नाविन्य हे कुंडलकर यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य. गुलाबजाम टीझरनिमित्ताने पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय येतोय. ‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाची कथा आहे. आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा काही खास मराठी खाद्यपदार्थ शिकण्यासाठी भारतात येतो. भारत भेटीत तो पुण्यात राहणाऱ्या राधाला (सोनाली कुलकर्णी) भेटतो. ती त्याला पारंपरिक मराठी पाककृती शिकवण्याचा निर्णय घेते. इथूनच त्यांच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते. पण मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कशी वळणे येतात हे सर्व सांगणारी सुंदर कथा म्हणजे हा चित्रपट. तेव्हा आता सोनाली, सिद्धार्थ यांच्या साथीने सचिन कुंडलकर यांच्या ‘गुलाबजाम’ ला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.