आता गायींचेही बनणार ‘आधार कार्ड’

सामना ऑनलाईन । भोपाळ

केंद्र आणि राज्य सरकारने अनेक सरकारी योजनांमध्ये आधार कार्ड अनिवार्य केल्यानंतर आता प्राण्यांचेही आधार कार्ड बनवण्याची योजना आखण्यात येत आहे. हे ऐकायला थोडे विचित्र वाटत असले तरीही आता आधारव्दारे गायींची नावे, पत्ता, फोटो, दूध देण्याची क्षमता आणि त्यांच्या आरोग्याशी संबधित बाबींचा तपशील ठेवण्यात येणार आहे. मध्यप्रदेश सरकारने गायींचे आधार कार्ड बनवण्याचा निर्णय घेतला आहे. प्राण्याची ओळख पटवून देणाऱ्या १२ अंकी डिजीटल आधार कार्डला देशभरात कोठेही एका क्लिकवर पाहता येऊ शकणार आहे.

या स्मार्ट चिपला मध्य प्रदेशमधील ९० लाख दूध देणाऱ्या प्राण्यांच्या कानात लावण्यात येणार असून केंद्र सरकारच्या या योजनेला देशातील अन्य राज्यांमध्येही सुरू करण्याची तयारी आहे. आता या योजनेला मध्येप्रदेशातील शाजापूर, धार, आगर मालवा आणि खरगोनामध्ये तब्बल एक हजार गुरांवर पायलट प्रोजेक्टव्दारे लागू करण्यात येणार आहे. या गावांत हि योजना यशस्वीरित्या पार पडल्यास राज्यातील अन्य ५१ जिल्ह्यांमध्येही गायी-म्हशींचे आधार बनवण्याची तयारी करण्यात आली आहे.

या योजनेसाठी एक विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून पशुपालन विभागातील कर्मचाऱ्यांना गायींचे ओळखपत्र बनवण्यासाठी टॅबलेट देण्यात येणार आहेत. त्यामध्ये ते गायींचे डिजीटल रेकॉर्ड बनवू शकतील. टॅबलेटच्या खरेदीसाठी सरकारने निविदा बनवण्याची कारवाई सुरू केली आहे. प्राण्याच्या कानात लावण्यात येणारे टॅग नोव्हेंबरपर्यंत तयार होण्याची शक्य़ाता वर्तवण्यात येत आहे.

सरकारच्या या पशुसंजीवनी योजनेला संपूर्ण देशभरात चालवण्यात येणार आहे. या संपूर्ण योजनेवर १५ करोड रुपये खर्च करण्यात येणार असून १५ करोडमधील ४० टक्के रक्कम म्हणजेच ६ करोड रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये आधार बनवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.