तेलगी संपला! निरपराध अधिकाऱ्यांचे काय?

>>प्रभाकर पवार

दीड दशकापेक्षाही अधिक काळ जेलमध्ये असलेला अब्दुल करीम लाडसाब तेलगी अखेर बंगळुरू येथील व्हिटोरिया रुग्णालयात मेंदुज्वराने तडफडून तडफडून वयाच्या ५६व्या वर्षी मरण पावला. २००१ साली कर्नाटक पोलिसांनी त्यास बनावट स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्या साथीदारांकडून सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा बनावट स्टॅम्पचा साठा पुणे येथून जप्त केल्यानंतर तेलगीला पुणे पोलिसांनी २००२ साली ताब्यात घेतले. तेव्हा रणजीत शर्मा हे पुणे पोलीस आयुक्तपदी होते. तेलगी जेलमध्ये असताना त्याची शाहिदा बेगम ही पत्नी तेलगीचे स्टॅम्प रॅकेट चालवीत असल्याचे अटक केलेल्या आरोपींकडून उघड झाले होते. तेव्हा रणजीत शर्मा यांनी तेलगीच्या पत्नीच्या अटकेची तयारी सुरू केली, परंतु त्यास पुणे पोलीस आयुक्तालयातील शर्मा यांच्याच एका सहकारी ज्येष्ठ अधिकाऱ्याने विरोध केला. तेलगी हा बेळगावच्या खानापूरचा होता. तसेच हा अधिकारीही तेलगीच्याच गावचा! त्यामुळे तेलगीच्या पत्नीच्या अटकेवरून शर्मा व तेलगीच्या गावच्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. ‘तेलगीच्या पत्नीला अटक करू नका, तिचा या घोटाळ्याशी काय संबंध?’ असाही या अधिकाऱ्याने सवाल केल्याने तेलगीच्या अटकेची कारवाई काहीशी थंडावली. परंतु सीबीआयकडे तपास सोपविला गेल्यानंतर शाहिदा बेगमला अटक झाली.

बायस तपास
१ जानेवारी २००३ रोजी रणजीत शर्मा यांची मुंबईचे स्वातंत्र्यानंतरचे १९ वे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून रणजीत शर्मा यांचा जो काही पडता काळ सुरू झाला त्यातून काही त्यांची सुटका झाली नाही. ज्यांनी अडीच हजार कोटींचे बनावट स्टॅम्प पेपर हस्तगत केले, आरोपींना अटक केली त्याच रणजीत शर्मा यांना रिटायर्ड आयपीएस अधिकारी एस. एस. पुरी व सुबोध जयस्वाल यांच्या एसआयटीने १ डिसेंबर २००३ रोजी अटक करून त्यांची ३५ वर्षांची निष्कलंक सेवा धुळीला मिळवली. मुंबईचे पोलीस आयुक्तपद शर्मा यांच्यासाठी शापित ठरले. ज्या कुणा आयपीएस अधिकाऱ्यांचे मुंबईचे आयुक्त व्हावे असे स्वप्न होते ते मातीमोल झाल्याने त्याच अधिकाऱ्यांनी कटकारस्थान करून रणजीत शर्मा यांना वर्षभर जेलमध्ये सडविले. अखेर वस्तुस्थिती लक्षात आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांची निर्दोष सुटका केली आणि एस. एस. पुरी व सुबोध जयस्वाल यांच्यावर खरमरीत ताशेरे ओढले. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने तपास ‘बायस’ केल्याचा निर्वाळा दिला.

तेलगीने देश लुटला
अब्दुल तेलगी हा मूळचा बेळगावचा! तेथेच त्याने कॉमर्सची पदवी संपादन केली. १९८४ च्या सुमारास तो मुंबईत आला आणि अंधेरी येथील उमर शेख या आपल्या नातेवाईकाकडे राहू लागला. कुलाबा येथील किसान गेस्ट हाऊसमध्ये मॅनेजरची नोकरी मिळाल्यानंतर तो पार्टटाइम चिटिंगही करू लागला. १९९१ च्या सुमारास मुंबई क्राइम ब्रँचच्या (आर्थिक घोटाळा विभाग) अधिकाऱ्यांनी त्यास अटक केली. चिटिंगची नोंद झालेला त्याचा हा पहिला गुन्हा होता. या गुन्ह्यात त्याला जेलची कोठडीही मिळाली.

त्या वेळी बनावट स्टॅम्प्स व शेअर्सप्रकरणी अटकेत असलेल्या रामरतन सोनी या चीटरबरोबर त्याची ओळख झाली. रामरतन सोनीने स्टॅम्प्स विक्रीचा परवाना मिळाल्यास आपण मालामाल होऊ. जेलमधून बाहेर आल्यावर स्टॅम्पस् वेंडर लायसन्स मिळविण्यासाठी तू प्रयत्न करणार का? असा सवाल तेलगीला केला. तेलगीने त्यास होकार दिला आणि जेलमधून बाहेर पडल्यावर प्रयत्न सुरू केले. खान्देशातील एका आमदाराला पकडून तेलगी तत्कालीन महसूलमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे गेला. आमदाराच्या शिफारसीनंतर १९९४ साली तेलगीला स्टॅम्प विक्रीचा परवाना मिळाला.

त्यानंतर तेलगीने मुंबईसह महाराष्ट्र व महाराष्ट्रासह साऱ्या देशात जो काही धुमाकूळ घातला त्याचा विचारच न केलेला बरा! २० टक्के खरे स्टॅम्स, तर ८० टक्के बनावट स्टॅम्पची तेलगीने देशभरात विक्री करून आपले दाऊदपेक्षाही मोठे साम्राज्य उभे केले. आमदार-मंत्री तेलगीपुढे लोळण घेऊ लागले. तेलगीने कोणत्या लोकप्रतिनिधीला, मंत्र्याला आर्थिक मदत केली नाही असे कधी झाले नाही. तेलगीने शासकीय अधिकारी व मंत्र्यांना हाताशी धरून सारा देश लुटला. त्या तेलगीला २००३ साली मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि मुंबई क्राइम ब्रँच अधिकाऱ्यांच्या मागेही शुक्लकाष्ठ लागले.

तेलगीला रॉयल ट्रीटमेंट दिली, ‘फेवर’ केले या आरोपावरून मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त रणजीत शर्मा, मुंबई क्राइम ब्रँचचे सहपोलीस आयुक्त श्रीधर वगळ, उपायुक्त प्रदीप सावंत आदी १४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना एस. एस. पुरी यांच्या ‘एसआयटी’ने अटक केली. त्यातील बहुसंख्य अधिकारी व कर्मचारी हे निरपराध होते. त्यांचा तेलगी घोटाळ्याशी सुतरामही संबंध नव्हता. परंतु एसआयटीने ‘बायस’ तपास केला. कुणावर तरी सूड उगविण्यासाठी अनेक निरपराध्यांचे बळी घेतले. एसआयटीमधील एका अधिकाऱ्याने रणजीत शर्मा यांच्या मुलाला आपल्या मुलीसाठी मागणी घातली होती, परंतु आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व उंचीने कमी असलेल्या मुलीशी आपण लग्न करणार नाही असे शर्मा यांच्या मुलाने सांगितल्याने दुखावलेल्या त्या तपास अधिकाऱ्याने Ommission-Commission च्या नावाखाली म्हणजे baseless आरोपाखाली शर्मा यांना अटक केली आणि सनसनाटी निर्माण केली.

क्राइम ब्रँचला कलंक
साऱ्या जगात लौकिक असलेल्या मुंबईचे पोलीस आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त आदी १४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तेलगी घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्याने तेलगी नावारूपाला आला. त्याला ३० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यातील १५ वर्षे त्याने जेलमध्ये भोगली होती. परंतु असाध्य आजाराने त्रस्त झाल्याने सारी शिक्षा भोगण्यापूर्वीच तो परवा गचकला. स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्राच्या १४ पोलिसांसह ७० जणांना अटक केली.

एस. एस. पुरीसारख्या रिटायर्ड व दुखावलेल्या अधिकाऱ्याच्या हातात न्यायालयाने कोलीत दिले. त्याने साऱ्या मुंबई क्राइम ब्रँचलाच आग लावली. तेलगीला त्याच्याच कुलाबा येथील घरात ठेवा, त्याला चांगली ट्रीटमेंट द्या, असे मंत्रालयातून ज्या मंत्र्यांनी आदेश दिले त्या मंत्र्याचा मात्र बाल बाका होऊ शकला नाही. यालाच म्हणतात ‘पक्षपात’! सत्तेचा दुरुपयोग! मेले मात्र निरपराधी पोलीस! शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली म्हणून त्यांना न्याय तरी मिळाला. परंतु ज्यांचा तेलगी घोटाळ्याशी संबंध नव्हता, सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यायची ऐपत नव्हती त्या अधिकाऱ्यांचे काय?

तेलगीच्या घोटाळ्याचा शिक्का बसल्यामुळे काही अधिकाऱ्यांना निर्दोष सुटूनही खात्यात घेण्यात आले नाही. ज्यांना घेण्यात आले त्यांना बढती देण्यात आली नाही. याला म्हणतात प्रशासन! ज्यांना संपवायचे आहे, नेस्तनाबूत करायचे आहे त्यांना अगदी पद्धतशीरपणे संपविले जाते. तेलगी घोटाळ्यात तेच झाले. रणजीत शर्मा यांचा काटा काढण्यासाठी अनेक निरपराध अधिकाऱ्यांचे बळी घेतले गेले. तेलगी घोटाळ्यामुळे क्राइम ब्रँचला कलंक लागला तो अद्याप पुसला गेला नाही. पोलिसांनीच पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली.