मुंबईकरांचा घामटा निघतोय!; पारा एक अंशाने तर आर्द्रता ६ टक्क्यांनी वाढली

सामना ऑनलाईन । मुंबई

सप्टेंबरमध्येच मुंबईकरांच्या कुंडलीत ‘ऑक्टोबर हीट’ ठाण मांडून बसली आहे. रोज अक्षरशः घामटा निघत असून आणखी दोन दिवस घामाचेच असणार आहेत. गेल्या दोन दिवसांत तापमानात एक–दीड अंशाची वाढ झाली असून हवेतील आर्द्रताही सहा टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे दिवसभर घामाच्या धारा लागत आहेत. हवामानाची हीच स्थिती पुढील दोन दिवस राहणार आहे.

मान्सूनच्या आगमनाच्या काळात समुद्रातून उत्तरेच्या दिशेने भूभागाकडे वारे वाहत होते. पण आता मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून उत्तरेकडून एका भूभागाकडून दुसऱ्या भूभागाकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अपेक्षेपेक्षा वाढले आहे. एरवी ७८-८० च्या घरात असलेली आर्द्रता ८५-८७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच पावसाळा असूनही मुंबईकर घामाघूम होत असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले.

हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे पाऊस
मान्सूनच्या परतीच्या प्रवासादरम्यान वारा एका भूभागाकडून दुसऱ्या भूभागाकडे वाहत आहे. यावेळी उष्णता वाढून हवेचा द्रोणीय भाग तयार होतो. ही परिस्थिती सध्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात निर्माण होत असल्यानेच तेथे सायंकाळी पाऊस पडत असल्याचे कुलाबा वेधशाळेच्या संचालिका शुभांगी भुते यांनी सांगितले.