साखरपुड्याला जाणारा टेंपो उलटून ३५ जखमी

सामना प्रतिनिधी, संगमेश्वर

चिपळूण येथील कोंड्ये गावातून साखरपुड्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी गावी निघालेल्या पवार कुटूंबीयांसह पाहुणे मंडळींचा टेंपो मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर नजिक धामणी येथील हॉटेल मुकुंद कृपा समोर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होवून झालेल्या अपघातात एकूण ३५ जण जखमी झाले. यातील तिघे अत्यवस्थ असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सायंकाळी सवा सहाच्या सुमारास घडला.

कातकरी समाजातील ३५ जण पवार कुटुंबातील नरेश याच्या साखरपुड्यासाठी आयशर टेंपोने बुरंबी येथील निकम यांच्या घरी निघाले होते. हा टेंपो रहीमतुल्ला अब्दुल लतीफ बेबल (३६) हा चालवत होता. सुरुवातीपासूनच टेंपो चालक गाडी भरधाव वेगाने चालवत होता. संगमेश्वर नजिक धामणी येथील मुकूंद कृपा हॉटेल समोर बेबल याचा टेंपो वरील ताबा सुटला आणि भरधाव वेगातच टेंपो रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच हाहाःकार उडाला. लहान मुलांसह वयस्करांच्या किंकाळ्यांनी काही काळ महामार्गावरील प्रवासीही सुन्न झाले.

अपघाता नंतर महामार्गावरील वाहनचाकांसह स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावून गेले. नरेंद्र महाराज संस्थांनची रुग्णवाहिका, १०८ नंबरची रुग्णवाहिका आणि देवरुख येथील शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश थीटे, पी. एस. आय. मोहन पाटील, हे. कॉ. मावळंकर आणि पोलीस कर्मचारी मदतीसाठी दाखल झाले . जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रल्हाद देवकरही अपघातस्थळासह ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते. सर्व जखमींना प्रथम संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघात नवरा मुलगा नरेश सुरेश पवार सहीत एकूण ३५ जण जखमी झाले आहेत. यातील तिघे अत्यवस्थ असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर २० जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उर्वरीत १५ जण किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.