पैशांचे आमिष दाखवून भाजपकडून फोडाफोडी; राष्ट्रवादीचा आरोप


पुणे, (प्रतिनिधी)

पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना रोख रक्कम आणि निवडणुकीचा खर्च आमदार करतील, असे आमिष दाखवत आहे. या सर्व आमिषांना बळी पाडून भाजप नगरसेवकांच्या फोडाफोडीचे राजकारण करीत आहे. भाजपने पक्ष जरूर वाढवावा. मात्र, लोकशाहीचा गळा घोटून वाढवू नये, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे.

शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील दोन विद्यमान नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर राष्ट्रवादीने हा आरोप केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गणेश घुले, गौरव घुले, किशोर गोसावी, आनंद रिठे, रमेश ढोणे, अक्षय शितोळे, संध्या नांदे, महेश वाबळे, जितेंद्र जगताप यांनीही प्रवेश केला.

तत्पूर्वी कोंढवा येथील कार्यक्रमात काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत कदम यांच्यासह राजाभाऊ कदम, प्रभाकर कदम, स्वप्नाली कदम, संजय घुले, नरेंद्र सोलंकी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कर्णे गुरुजींचा नगरसेवकपदाचा राजीनामा

बापूराव कर्णे गुरुजी हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर चौथ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी याच टर्ममध्ये स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे कर्णे गुरुजी यांचा भाजपप्रवेश हा राष्ट्रवादीला चटका लावून गेला आहे. या प्रवेशापूर्वी म्हणजे आज सकाळी कर्णे गुरुजी यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.