ऐवजासह चोरटयांनी फराळावरही मारला ताव

1

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांनी ७ ते ८ नोव्हेंबरच्या दरम्यान रात्री गारमाळ आणि बासंबा येथे दहा घरे फोडून रोख रक्कम, कापूस, घरगुती साहित्य असा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे बासंबा येथे एका घरात चोरटयांनी दिवाळीच्या फराळावर देखील ताव मारला.

हिंगोली शहरापासून जवळ असलेल्या गारमाळ परिसरातील अस्लम नंदावाले, रफी बशीर, रमजान रनू चौधरी, इमाम कासम प्यारेवले या चौघांच्या घरी चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरट्यांनी घरातील साहित्य रस्त्यावर फेकून दिले. तसेच सोन्या-चांदीचे दागिने, हळद व सोयाबीनचे पोते, रोकड असा ऐवज पळविला. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम गुहाडे यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली. तसेच श्वान पथक देखील दाखल झाले.

बासंबा येथे ६ घरात चोरीच्या घटना घडल्या असून केशव माधव घुगे, बन्सी किसन घुगे, ज्ञानेश्वर नामदेव पाटणकर यांच्यासह इतर ३ ठिकाणी चोरी झाल्याचे पोलीसांनी सांगितले. बासंबा येथे पोलीस ठाणे असुन या प्रकरणाची अद्याप नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.