आष्टी येथे लाठी चार्जमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । नांदेड

भीमा – कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ हदगांव तालुक्यातील आष्टी येथे भीम सैनिकांनी छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने रॅपीड अॅक्शन फोर्सच्या जवानांना बुधवारी लाठी चार्ज करावा लागला. यावेळी योगेश प्रल्हाद जाधव (१६) या दहावीच्या विद्यार्थ्याच्या मानेवर लाठीचा तडाखा बसल्यामुळे त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे येथील वातावरण अधिकच तंग झाले आहे.

आष्टी येथे विविध संघटनांनी सकाळपासूनच आंदोलन सुरु केले होते. यावेळी प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र जमावाने हिंसक वळण घेतल्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यामुळे घाबरुन अनेकजण सैरावैरा पळत होते. या जमावाचा पाठलाग करत असताना पोलिसांनी दहावीच्या वर्गात शिकत असलेला आष्टी येथील योगेश प्रल्हाद जाधव यालाही मारहाण केली. त्याच्या मानेवर जबर मार बसल्याने तो जागीच खाली पडला. त्याच्या तोंडातून व नाकातून भळाभळा रक्त वाहत होते. उपस्थितांनी त्याला हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले. या घटनेमुळे हदगाव, तामसा परिसरात तसेच जिल्ह्याच्या अनेक भागात संतापाचे वातावरण पसरले आहे.

पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी मात्र सदर मुलाला पोलिसांकडून मारहाण झालेली नाही. त्यांच्या अंगावर कुठेही जखमा नाहीत. बसस्थानकाजवळ तो थांबला होता. तेथेच तो चक्कर येऊन पडला. लगेच दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची आम्ही सविस्तर चौकशी करीत आहोत, असे सांगितले.

या घटने नंतर संतप्त भीम सैनिकांनी पोलिसांवरच खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्यानंतर हदगांव शहरात तीन दुचाकी व पान टपरी जाळण्यात आली.