सायकल चालवण्याच्या नादात मुलगी पोहोचली एका शहरातून दुसऱ्या शहरात

प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । भिगवण

लहानग्याला एखाद्या गोष्टीचे वेड असेल अन ती आवडीची गोष्ट मिळाली तर काय होते त्याचा प्रत्यय भिगवण येथे आला. चौथीच्या वर्गात शिकणारी मुलगी आपल्या छंदापायी नकळत सायकल चालवत कुरकुंभ (ता. दौंड) येथून तब्बल 25 कि मी अंतर कापून भिगवणला आली मात्र पुढे काही न समजल्यामुळे ती वाट चुकली. मात्र भिगवण पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिला आई- वडील सापडले.

सितु ओमप्रकाश मिश्रा असे मुलीचे नाव आहे. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही दहा वर्षांची मुलगी भिगवण येथील पुणे सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या आठवडेबाजाराजवळ भांबावलेल्या स्थितीत फिरत असल्याची जालिंदर बनसोडे (रा. पळसदेव ता. इंदापूर) यांना आढळून आली. याबाबत त्यांनी भिगवण पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे, पोलीस कॉन्सटेबल किरण कदम यांनी सदर मुलीला नाव पत्ता विचारला असता तिने गोरखपूर सांगितले. बाकी काही सांगता न आल्याने पोलिसांपुढे तीच्या आई- वडील व गावचा पत्ता मिळवणे आव्हान झाले पोते. पोलिसांनीही तपासाचे चक्रे सुरु केले. त्याबाबत त्यांनी लागलीच उत्तरप्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील कंट्रोल रुमचा नंबर इंटरनेटद्वारा शोधला. पोलिसांनी त्या मुलीला बोलण्यास प्रवृत्त करून आणखी माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता ती नंदानगरमधील असल्याची माहिती समोर आली.

लागलीच तेथील पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करून मुलीचा तेथील पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला असता दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशमधून सिक्युरिटीच्या कामनिमित्त आई- वडीलांसह सदर मुलगी दौंड तालुक्यातील कुरकुंभ याठिकाणी आल्याचे समजले. मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला असता सकाळी सहा वाजल्यापासून सायकल खेळत कोठे गेले समजले नाही. अनाहुतपणे सायकल चालवण्याच्या छंदापायी भिगवणला पुणे सोलापूर महामार्गांने पंचवीस किमीचे अंतर कापून ती आल्याचा प्रकार लक्षात आला. भिगवण पोलिसांनी मुलगीला तीच्या वडीलांच्या स्वाधीन केली आहे.