भीमा– कोरेगावात दगडफेक, जाळपोळ

फाईल फोटो

सामना ऑनलाईन, लोणीकंद

भीमा-कोरेगाव येथे आज साजऱया झालेल्या शौर्यदिनाला पहिल्यांदाच गालबोट लागले. पुणे-नगर रोडवर भीमा-कोरेगाव ते पेरणे फाटय़ादरम्यान सकाळी ११ वाजता अज्ञातांनी वाहनांवर दगडफेक करत जाळपोळही केली. त्यात ४० हून अधिक कार आणि इतर वाहनांचे नुकसान झाले. तसेच तणावामुळे कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे ही महामार्गालगतची गावे बंद ठेवण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच वढू बुद्रुक येथे गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीची विटंबना करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आज भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादनासाठी आलेल्या आंबेडकरी बांधवांवर दगडफेक आणि हल्ल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे तणाव निर्माण झाला असून भीमा-कोरेगाव येथील दगडफेक, जाळपोळीचे पडसाद मराठवाडय़ातही उमटले.

विजय रणस्तंभाला भीमसैनिकांची मानवंदना

भीमा कोरेगाव येथील विजय रणस्तंभाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भीमसैनिकांना मानवंदना देणयासाठी पेरणे फाटा येथे लाखो नागरिकांनी गर्दी केली होती. ३१ डिसेंबर रोजीच हजारो भीमसैनिक मुक्कामी दाखल झाले होते. आज सकाळपासूनच विजय रणस्तंभ परिसरात भीमसैनिकांची गर्दी जमली होती.

मराठवाडय़ातही पडसाद

भीमा-कोरेगाव परिसरात दलितांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद संभाजीनगरात सोमवारी उमटले. दलित वस्त्यांतील तरुण, कार्यकर्ते रस्त्यावर आले आणि त्यांनी रास्ता रोको करून किरकोळ दगडफेक केली. या दगडफेकीत खासगी वाहनांचे आणि एस. टी.चे नुकसान झाले.  तरुणांनी घोषणाबाजी करत क्रांती चौक, महावीर चौक, जालना रोड, नूतन कॉलनी व रेल्वे स्टेशनकडून येणाऱया चारही रस्त्यांवर रास्ता रोको केला.

शिवसैनिक मदतीला धावले

व्यापाऱयांना धीर देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिक रस्त्यावर आले. त्यांनी व्यापाऱयांना दुकाने सुरू करण्याचे आवाहन केले. ज्या दुकानांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.