वातावरण चिघळलं… कोल्हापूरमध्ये दोन गटात दगडफेक

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

भीमा कोरेगावमध्ये घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्येही आज बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी शहरातील महत्वाच्या भागात मोर्चे काढून सरकारविरोधात निषेध नोंदवला. मात्र दुपारी परिस्थिती चिघळली, आंदोलकांनी वाहने, हॉटेल, दुकानं यांचं नुकसान केलं. आंदोलक पोलिसांवर धावून गेले. त्यांना रोखताना दोन पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर दोन गटांमध्ये घोषणाबाजी झाली. तसेच दोन्ही बाजूने दगडफेक झाली, अखेर पोलिसांनी धारा १४४ लागू केली.

आज सकाळपासून शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. आंदोलक बिंदू चौकातून बंदची हाक देत दसरा चौकात आले, तसेच शहराच्या अन्य भागातून देखील आंदोलक या भागात जमले. त्यानंतर एसटी स्टँड ते दाभोळकर कॉर्नर चौकात रास्तोरोको करण्यात आला. काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना रास्तोरोको थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आंदोलक पोलिसांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर शांततामय सुरू असलेल्या आंदोलनाने आक्रमक रूप घेतले. स्टेशनरोड परिसरातून परतताना आंदोलकांनी हॉटेल, काचेची दारं असलेल्या दुकानांना लक्ष्य केलं. दगडफेक केली. बिंदू चौकातून आलेल्या गटाने तरुण भारतच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली.

या परिस्थितीवर चिडून अन्य गटांचे लोकही रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलकांच्या विरोधात घोषणा दिल्या. गुजरी महादा रोड परिसरात जमले. पोलिसांनी त्यांना रोखले. पण ट्रेझरी ऑफिस चौकात दोन्ही आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही गट आक्रमक झाले. दोन्ही बाजूने दगडफेक झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. ही स्थिती बिघडू नये म्हणून सध्या शहरात धारा १४४ लागू करण्यात आली.

++++++++