‘अल्ला हू अकबर’ ओरडत अमेरिकेत दहशतवाद्याचा ‘ट्रक’हल्ला, ८ जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क

अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. मॅनहॅटन भागात एका ट्रकचालकाने सायकलिंगसाठी बनवण्यात आलेल्या ट्रॅकवर बेदरकारपणे ट्रक चालवत ८ जणांचा बळी घेतलाय तर ११ जण जखमी झाले आहेत. हा हल्ला करणाऱ्याची ओळख पटली असून त्याचे नाव ‘सैफुल्लो हबीबुल्लाएव्हीक सायपोव्ह’ आहे, हा उझबेकीस्तानचा रहिवासी असून ७ वर्षांपूर्वी तो अमेरिकेत आला होता. जी गाडी हल्ल्यासाठी वापरण्यात आली होती ती भाड्याने घेतलेली होती असं पोलिसांनी सांगितलं आहे.

manhatton-terrorist

लोकांना चिरडल्यानंतर सैफुल्लो पळून जाण्याच्या तयारीत होता, यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या ज्यातली एक गोळी त्याच्या पोटामध्ये लागली होती. त्याच्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो शुद्धीत आल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे.

या दुर्घटनेमध्ये अर्जेंटीनाचे काही नागरीक मृत्यूमुखी पडल्याचं तिथल्या सरकारने सांगितलं आहे, मात्र त्यांची संख्या किती हे कळू शकेललं नाही. बेल्जियमचाही एक नागरीक मृत्यूमुखी पडल्याचं तिथल्या सरकारने सांगितलं आहे.

manhatton-attack-truck

हा हल्ला आपणच घडवून आणल्याचा दावा आयसिसने केला आहे. फ्रान्समधील नाईसमध्ये आणि लंडनच्या संसदेबाहर अशाच पद्धतीने दहशतवाद्यांनी ‘ट्रक’हल्ला केला होता. अनेक देशांमध्ये असलेल्या कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचा वापर करणं कठीण जातंय, त्यामुळेच दहशतवादी हल्ल्यासाठी हा मार्ग अवलंबत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक छऱ्याची आणि एक पेंटबॉल गन जप्त केली आहे. अमेरिकेमध्ये २ जिहादी गट असून एका गटाचं नाव हे इस्लामिक मूव्हमेट ऑफ उझबेकिस्तान असं आहे, हा गट आयसिसशी निगडीत आहे. याच गटाने हा हल्ला केला असावा असा पोलिसांना दाट संशय आहे.