इसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी सोमालियात

सामना ऑनलाईन। सीरिया

जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या इसिसचा म्होरक्या अबू बकर बगदादी जिवंत असून त्याने सोमालियात तळ ठोकला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बगदादीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. इराक व सीरियात झालेल्या स्फोटांमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. पण आता त्याने सोमालियात इसिसचा नवीन अड्डा बनवल्याचे वृत्त आहे.

नाटोच्या सैन्याने इराक व सीरियामधील इसिसचे तळ उदध्वस्त केले. यात इसिसचे अनेक म्होरके ठार झाले . इराक व सीरियावरही अमेरिकेच्या सैन्याने कब्जा करत इसिसला पळता भुई थोडी केली. यामुळे बगदादीला जोरदार झटका बसला होता. त्यानंतर बगदादीने इराक व सीरियामधून गाशा गुंडाळत सोमालिया गाठले. चोरी, अपहरण, समुद्री चाचांचा उपद्रव खंडणी अशा गुन्ह्यांचे माहेरघर असलेल्या सोमालियात बगदादीने बस्तान बसवले आहे. येथे कायद्यापेक्षा दहशतवादी संघटनांची हुकुमत असल्याने बगदादीची इसिस येथे फोफावत आहे. येथील दहशतवादी संघटनेबरोबर बगदादीने हातमिळवणी केली असून त्यांच्या मदतीने पुन्हा एकदा इसिस सक्रिय करण्याचा बगदादीचा डाव आहे. पण येथील अल शबाब ही दहशतवादी संघटना इसिससाठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे दहशत निर्माण करण्यासाठी यावर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते मे महिन्या पर्यंत इसिसने सोमालियात 39 हल्ले केले आहेत. यात 14 जण ठार झाले असून इसिसने आपली पाळमूळं सोमालियात रोवण्यास सुरूवात केली आहे.