दहशतवाद्यांनी केले पोलिसांच्या कुटुंबियांचे अपहरण, पोलीस दल हादरले

सामना ऑनलाईन, श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी कमीतकमी ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे अपहरण केले आहे. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकींसाठी सतत चर्चेत असलेल्या शोपियां, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग या जिल्ह्यांमधील पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अपह्रत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांची घरं शोधून शोधून घरातील मुलांना किंवा भावांना पळवून नेलं आहे. पोलीस महासंचालक एसपी पाणी यांनी आम्हाला अजूनपर्यंत अपहरणाची तक्रार मिळाली नसल्याचं सांगितलंय, मात्र आम्ही या हे प्रकरण बारकाईने पाहात असं सांगितलं आहे.

गुरुवारी ४ पोलीस कर्मचाऱ्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यानंतर दहशतवाद्यांची घरं अज्ञातांनी जाळून टाकली होती. शोपियां जिल्ह्यातील या घटनेचा बदला घेण्यासाठी पोलिसांच्या कुटुंबियांचं अपहण करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी या दहशतवादी घटनांनंतर हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी रिजाज नईकूच्या वडिलांना अटक केली होती. कदाचित याचा बदला घेण्यासाठीही हे अपहरण करण्यात आलं असावं असं सांगितलं जातंय.