New Zealand Firing – बांगलादेश-न्यूझीलंडमधील तिसरा कसोटी सामना रद्द

सामना ऑनलाईन । ऑकलंड

न्यूझीलंडमध्ये ख्राईस्टचर्च भागात मशिदीमध्ये झालेल्या गोळाबाराच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेश आणि न्यूझीलंडमधे होणारा तिसरा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. शुक्रवारी ख्राईस्टचर्चमधील 2 मशिदींमध्ये गोळीबार झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्रथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश-न्यूझीलंड दरम्यान 16 मार्च रोजी होणारा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान,  गोळीबार झाला तेव्हा  बांग्लादेशचा क्रिकेट संघ  नमाज पढण्यासाठी मशिदीतच होता. मात्र सर्व खेळाडू सुरक्षित असल्याचे क्रिकेटपटू तमीम इकबाल याने ट्विट करून  सांगितलं आहे.

याआधी न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात हॅमिल्टन आणि वेलिंग्टन येथे दोन कसोटी सामने खेळवण्यात आले होते. यापैकी दोन्ही सामने न्यूझीलंडने जिंकले होते. आता तिसरा सामना ख्राईस्टचर्च येथे खेळवण्यात येणार होता. मात्र आज झालेल्या घटनेनंतर सामना रद्द करण्यात आला आहे.

न्यूझीलंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबाराप्रकरणी आतापर्यंत एक महिला आणि 3 पुरुष अशा 4 संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच परिसरातील वाहनांना जोडलेली स्फोटके देखील पोलिसांनी निकामी करून जप्त केली आहेत. यावरून हा हल्ला पूर्वनियोजित असून यामध्ये जबर घातपात घडवण्याचा डाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.