मसालेदार…Continental!!

2

मीना आंबेरकर

पिझ्झा बर्गरची मज्जा वेगळीच… ही गंमत घरी अनुभवूया… चवीसोबत पौष्टीकही होईल…

साहित्य…300 ग्रॅम मैदा, 15 गॅम यिस्ट, 1 चमचा साखर, 1 चमचा तूप किंवा तेल, पाऊण ते दीड कप कोमट पाणी, 100 ग्रॅम फरसबी, 1 वाटी ओला मटार, 2 सिमला मिरच्या, 2 ते 3 टोमॅटो, 3 ते 4 सफेत कांदे, 2 चमचे बटर, 4 ते 5 तमालपत्र, 3 ते 4 दालचिनी, 2 चमचे टोमॅटो सॉस, 2 चमचे चिली सॉस, 3 ते 4 चीज क्युब्स, अर्धा चमचा मिरीपूड, चवीप्रमाणे मीठ.

कृती… यिस्ट आणि साखर कोमट पाण्यात भिजत घाला. एका थाळीत तेल किंवा तूप व मीठ फेटून घ्या. त्यात मैदा चाळून टाका. भिजत घातलेल्या यिस्टमध्ये कोमट पाणी घालून 1 ते दीड कप पाणी करा. त्या पाण्याने मैदा मऊसर भिजवा. लागल्यास आणखी पाणी घाला. मैदा 1 ते दीड तास झाकून ठेवा. एका कढईत 2 चमचा बटर टाकून त्यात तेजपत्रा, दालचिनी व कांदा बारीक चिरून टाका. मिरीपूड टाकून थोडा परतून घ्या. त्यात मटार, फरसबी व सिमला मिरची साधारण बारीक चिरून टाका. त्याचवेळी मीठ टाकून झाकण ठेवा. मंद गॅसवर एक वाफ काढा. भाजी अर्धी कच्ची झाल्यावर पाणी सुटले असल्यास पाणी सुकवून गॅस बंद करा. साधारण दीड तासाने भिजत ठेवलेला सैल मैदा वर आल्यावर पिझ्झा थाळीला तूप लावून त्यातील मैदा थाळीत टाकून हलक्या हाताने पसरवून द्या. साधारण 8 इंचाच्या 3 थाळय़ा होतात. वरील तयार भाजीतील अख्खा गरम मसाला काढून त्यातील अर्धी भाजी प्रत्येक पिझ्झा बेसवर पसरवा. 17 ते 20 मिनिटांनी पिझ्झा बेक करण्यास ठेवा. ओव्हन मॅक्झिमम टेंपरेचरवर ठेवा. 15 ते 20 मिनिटांत पिझ्झा बेक होतात. पिझ्झा थाळीतून खालून उचलून पाहिल्यास गुलाबी रंग आल्यावर बाहेर काढून त्यावर बारीक चिरलेला टोमॅटो (साल काढून), टोमॅटो सॉस, चिली सॉस व चीज किसून टाका. खायला देताना 5 मिनिटे पुन्हा ओव्हनमध्ये गरम करा. गरम असताना पिझ्झा कटरने कापून घ्या.

pizza-final

चिकन पिझ्झा… करताना व्हेज पिझ्झाप्रमाणे भाज्या न घेता उकडलेली 2 वाटय़ा बारीक तुकडे केलेली चिकन किंवा 1 वाटी व्हेज पिझ्झाप्रमाणे भाजी व 1 वाटी चिकनचे तुकडे घ्यावेत.

साहित्य… ब्रेड, 300 ग्रॅम मैदा, 20 ग्रॅम यिस्ट, 2 टी-स्पून तूप, थोडे मीठ, 5 ते 6 चमचे दळलेली साखर, दीड कप कोमट पाणी.

कृती…यिस्ट व दळलेली साखर 10 मिनिटे पाव कप कोमट पाण्यात भिजत घाला. एका थाळीत तूप व मीठ फेसून घ्या. त्यात मैदा चाळून टाका. नंतर भिजत घातलेल्या यिस्टमध्ये 1 कप कोमट पाणी टाकून घ्या. त्या पाण्यात मैदा पिझ्झाच्या मैद्यापेक्षा सैल भिजवा. तो मैदा 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा. ब्रेडच्या गोल (वाटय़ा) मोल्डला भरपूर तूप लावून घ्या. भिजवलेल्या मैद्याचे लहान गोळे करून त्यात ठेवा. ओल्या कपडय़ाखाली ऊबदार जागेत दीड ते 2 तास ठेवा. 13 ते 14 ब्रेड होतात. नंतर ओव्हन कूल ठेवून त्यात ब्रेड ठेवून 15 ते 20 मिनिटे बेक करा. ब्रेडला रंग आला नाही तरी ब्रेड काढून घ्या. ब्रेड थंड झाल्यावर तुपात ब्रेड तळून घ्या.

भाजी
साहित्य…500 ग्रॅम फ्लॉवर व मटार, 4 ते 5 उकडलेले बटाटे, 5 ते 6 कांदे, 3-4 टोमॅटो, 1/2 टी-स्पून गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, 8 टे.स्पून सुके खोबरे, 1 इंच आले, 15 ते 20 लसूण पाकळय़ा, अर्धा वाटी कोथिंबीर, 2 टी-स्पून धणे-जिरेपूड, 2 टे-स्पून तेल, मीठ चवीनुसार, 5 टी-स्पून बटर.

कृती...फ्लॉवर व मटार कूकरमध्ये चाळणीत ठेवून उकडून घ्या. खोबरे थोडे भाजून घ्या. त्यात आले, लसूण टाकून पाणी न घालता वाटून घ्या. एका कढईत तेल घालून त्यात कांदा बारीक चिरून टाका. थोडा परतल्यावर त्यात गरम मसाला व खोबऱयाचे वाटण टाका. चांगले परतून घ्या. नंतर लाल तिखट परता व त्यात टोमॅटो बारीक चिरून टाका. टोमॅटोचे पाणी सुकल्यावर उकडलेल्या भाज्या मीठ टाकून भाजी सुटेपर्यंत परता. भाजी सुकल्यानंतर त्यात बटाटे बारीक चिरून टाका. सर्व भाजी सुकवून घ्या. गॅस बंद करून त्यात धणे, जिरेपूड, कोथिंबीर व बटर टाका. तळलेला ब्रेड मधोमध कापून त्यात तयार भाजी घालून त्यावर काकडी, टोमॅटो, कांदा स्लाइस ठेवा. पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळून टूथपिक लावा.

lollypop-2

चिकन लॉलीपॉप

साहित्य …15 ते 20 चिकन विंग पिसेस (लॉलीपॉप) 1 अंडे, अर्धे लिंबू, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 इंच आले, 10 ते 12 लसूण पाकळय़ा, थोडा ऑरेंज कलर, 2 चमचे मैदा, लागल्यास कॉर्नफ्लोवर, चवीप्रमाणे मीठ.

कृती ...लॉलीपॉपचे पिसेस बाजारात तयार मिळतात. त्याचे बोन वर काढून सर्व मांस खाली करा. धुऊन कपडय़ात बांधून ठेवा. सर्व पाणी निथळून घ्या. एका भांडय़ात आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, ऑरेंज कलर, लिंबूरस व अंडे फेटून घ्या. त्यात चिकनचे पिसेस टाकून ठेवा. दोन तासांनंतर त्यात मैदा चाळून टाका. फार सैल वाटल्यास कॉनफ्लॉवर टाकून थोडे घट्ट करा. 15 ते 20 मिनिटांनी कढईत तेलात डिप फ्राय करा.