टेस्टी पराठे

2

मीना आंबेरकर
.
आपल्या जेवणात पोळी हा प्रकार असतोच असतो. पोळीभाजी हा आपल्या जेवणातील एक लोकमान्य प्रकार आहे. तो शक्यतो आपण टाळत नाही. परंतु कधी कधी रोज जेवणात पोळी खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो. मग त्याला पर्याय काय? पर्याय आहे. नक्कीच आहे. तो म्हणजे पोळीऐवजी परोठा खाणे. खरोखर गरमागरम पराठय़ाचे नाव जरी काढले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. गरमागरम परोठे… त्याच्याबरोबर एखादी आवडीची भाजी… मस्त बेत जमून जातो. वास्तविक परोठा हा पंजाबी प्रकार इतर प्रांतीयांनीही आपलासा केला आहे. तर मग बघूया वेगवेगळय़ा प्रकारचे परोठे आणि त्यांच्या पाककृती.

alo-parastha-11

आलू पराठा

साहित्य… पाव किलो बटाटे, दोन मध्यम कांदे, आलं, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, ओले खोबरे, लिंबू, साखर, मैदा, कणिक, तूप, मीठ.

कृती ...बटाटे उकडून सोलावे आणि बटाटय़ाच्या भरड किसणीवर किसावे. आलं, लसूण, मिरच्या वाटाव्या. कांदा बारीक चिरावा. फोडणीत कांदा व ठेचा परतावा. कांद्याला वाफ आली की, बटाटय़ाचा कीस, चवीप्रमाणे साखर, लिंबाचा रस, ओले खोबरे, कोथिंबीर घालून परतून घ्यावे. हे मिश्रण गार करावे. दोन वाटय़ा मैद्यामध्ये अर्धी वाटी कणिक, मीठ मुटका वळेपर्यंत कडकडीत मोहन घालून मैदा पाण्याने घट्ट भिजवावा. त्याचे गोळे करावे. दोन लहान पुऱया लाटून त्यात पुरण भरून पुन्हा पराठा अलगद लाटावा. जाड तव्यावर दोन्ही बाजूंनी पराठा भाजावा. दुसऱया तव्यावर थोडे तूप घालून खालून वरून पराठा चुरचुरीत करावा किंवा सर्व पराठे भाजून ठेवावे. नंतर एक एक करून तव्यावर टाकून तूप सोडून खमंग करावा.

mix-dal-2

मिश्र डाळीचा पराठा

साहित्य … मुगाची डाळ, उडदाची डाळ, धणे-जिरे पूड, मीठ, पिठी, तिखट गरम मसाला, तेल.

कृती …दोन्ही डाळी प्रत्येकी अर्धी वाटी रात्री भिजत घालाव्या. सकाळी डाळी जरा भरडसर वाटाव्या. त्यात एक चमचा धणे-जिऱयाची पूड, चिमूटभर गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून कालवावे. थोडय़ा तेलावर मंद परतून वाफ देऊन खाली उतरवावे आणि मिश्रण गार करत ठेवावे. दीड वाटी कणकेत एक चमचा पिठी, कडकडीत तेल व मीठ घालून कणिक घट्ट भिजवावी. थोडय़ा वेळाने तेल-पाणी लावून लिंबावी. तिचे लहान बटाटय़ाएवढे गोळे करावे. एका गोळय़ाची गोल वाटी करून त्यात डाळीचे पुरण भरावे आणि उंडा तयार करावा. त्याला पिठी लावून अलगद लाटावा. गॅसवर जाड बुडाचा तवा तापवून दोन्ही बाजूंनी मंद भाजावा आणि दुसऱया उथळ तव्यावर टाकून त्यावर कडेकडेने दोन्ही बाजूंनी तूप सोडून खमंग करावा. पराठय़ांसाठी दोन तवे वापरले म्हणजे पराठय़ाला तेलकट वास येत नाही. तसेच पराठय़ांसाठी तेलाऐवजी तूप वापरल्यास ते जास्त चांगले लागतात.

paneer-partha

पनीर पराठा

साहित्य… (आतील पुरणाचे) एक वाटी पनीर, एक वाटी ओला मटार जरा ठेचून, एक चमचा आलं, मिरच्यांचा ठेचा, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, एक मोठा कांदा बारीक चिरून, मीठ.
कृती….दोन चमचे तेलावर कांदा गुलाबी रंगावर परतावा. त्यात वाटलेला ठेचा व मटार घालून मंद शिजवावे. नंतर त्यात ओलं खोबरं, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, साखर व पनीरचे तुकडे घालून ढवळावे. चतकोर लिंबाची फोड पिळून उतरवावे. (वरचे आवरण) दोन वाटय़ा कणीक, दोन टेस्पून तेल, थोडे मीठ घालून पाण्याने घट्ट भिजवावी. त्याच्या बोटय़ा करून दोन पुऱया लाटाव्या. एका पुरीवर कडेपर्यंत सारण व दुसरी पुरी ठेवून कडा बंद कराव्या. एका तव्यावर पराठा भाजावा व दुसऱया तव्यावर तूप पसरून त्यावर ठेवून खमंग करावा. त्याच्या जोडीला पातळ चिंचेची चटणी करावी.

paratha-111

कोथिंबीर-पुदिना-आले-लसूण पराठा

साहित्य… कोथिंबीर एक जुडी, आले पेस्ट एक चमचा, लसूण पेस्ट एक चमचा, हिरवी मिरची पेस्ट एक चमचा, कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरलेली ती पण मिक्सरवरून काढावी. मीठ चवीनुसार. अख्खे तीळ एक डाव. कणीक एक भांडे, एक डाव डाळीचे पीठ, एक डाव मैदा मोहनासाठी आणि पराठय़ावर सोडण्यासाठी तेल अंदाजे कणकेत एक डावभर मोहन, पुदिना अर्धी जुडी.

कृती…प्रथम कोथिंबीर निवडून धुवून घ्यावी. आले, मिरची, मीठ, लसूण, पुदिना, कोथिंबीर धुवून सर्व साहित्य मिक्सरमधून काढावे आणि मग तीळ घालावे. कणीक, डाळीचे पीठ, मैदा यात ते मिश्रण घालून घट्ट मळावे. बेताचे पातळसर छोटे छोटे पराठे लाटावे. गॅसवर तवा ठेवून तांबूस रंगावर शेकवावे. वरून तेल सोडावे. मंद गॅसवरच भाजावे. हिरव्या रंगाचे हे पराठे दिसायलाही फारच छान दिसतात.

नारळाचा पराठा

साहित्य….नारळ, मैदा, साखर, तूप, वेलदोडे, केशर.
कृती... दोन वाटय़ा मैद्यामध्ये पाव वाटी कडकडीत तेल घालून मैदा पाण्यात घट्ट भिजवावा. (आतलं सारण) दोन नारळांचे खोबरे खवून त्यात किसाच्या निमपट साखर घालून गॅसवर ठेवून घट्टसर करावे. त्यात वेलची पूड व केशव घालावे. ओलसर असतानाच उतरवावे. गार होईपर्यंत अधूनमधून ढवळावे. भिजवलेल्या मैद्याचे गोळे करून दोन पुऱया लाटाव्यात. एका पुरीवर सगळे सारखे सारण पसरावे. त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा जरा दाबाव्या व अलगद लाटावे. पसरट तव्यावर थोडे तूप घालावे. त्यावर पराठा घालून दोन्ही बाजूंनी खमंग चुरचुरीत करावा. नारळाच्या खोबऱयात निम्मा खवा घालून साखर घालून सारण तयार केल्यास खवा-नारळाचे पराठे अधिकच चांगले लागतात.