थोडा टाइमपास – ‘मुबारकॉ’


  • वैष्णवी कानविंदे – पिंगे

धी कधी डोकं बाजूला ठेवून फक्त टाइमपास म्हणून आपल्याला थोडी करमणूक हवी असते. अशामुळे हाती काही विशेष लागत नसलं तरी जरा वेळ बरा जातो आणि दगदगीच्या आठवड्यानंतर थोडा पावसाळलेला, मरगळलेला वीकेंड बरा जातो… तर याच धाटणीतला ‘मुबारकॉ’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. जास्त अपेक्षा न ठेवता जुजबी करमणूक पाहिजे असेल तर या वीकेण्डला हा सिनेमा नक्की चांगला उपाय ठरू शकतो.

या सिनेमाच्या धाटणीत तसं नावीन्य नाही. जुळी, सारखी दिसणारी भावंडं, मग मोठेपणी त्यांच्या सारख्या दिसण्यातून होणारे गोंधळ, प्रेमप्रकरण, त्यातून उडणारे गोंधळ वगैरे वगैरे. मग गोंधळांची मालिका वाढत जाते आणि शेवटी सगळा गुंता सुटतो. आजवर असे अनेक विनोदी सिनेमे आपण पाहिले असतील. हा सिनेमा त्यातलाच एक आहे. विशेष नावीन्य असं काही नाही, पण तो ज्या पद्धतीने मांडला आहे, त्यामुळे तो खुशखुशीत होतो आणि अपेक्षित असणारं तात्पुरतं हास्य आपल्या वाट्याला येतं.

ही गोष्ट आहे दोन जुळ्या, सारख्या दिसणाऱ्या भावांची. जन्मताच त्यांचे आई-वडील गेल्यामुळे त्या दोघांना वेगळं केलं जातं. एका मुलाला भावाच्या घरी आणि दुसऱ्याला बहिणीच्या घरी पाठवलं जातं आणि तिथेच ती मुलं लहानाची मोठी होतात. मग मोठी झाल्यावर जेव्हा त्यांच्या लग्नाची वेळ येते तेव्हा अनेक कर्मधर्मसंयोग जुळून येतात आणि गोंधळाची मालिका सुरू होते. त्यातूनच ज्या गमती जमती घडतात तो हा सिनेमा.
या सिनेमाची कथा विनोदी आहे आणि अशा सिनेमांना गरज असते ती खुशखुशीत संवादांची. या सिनेमामध्ये ती बाजू नक्कीच उजवी आहे. मुबारकाँमधले संवाद बऱयापैकी हसवतात आणि त्यातूनच या सिनेमाची जास्त मजा येते. पटकथा ही नेटकी बांधली गेली आहे. शेवटाकडे हा सिनेमा खूप जास्त ओढला गेला असला तरी अशा सिनेमांमध्ये बहुतेकदा ही गोष्ट अपेक्षितच असते.

अर्जुन कपूर या कलाकाराला दोन भूमिका साकारायच्या होत्या आणि अहो आश्चर्यम, या दोन्ही भूमिका त्याने बऱयापैकी चांगल्या साकारल्या आहेत. दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा चांगल्या उभ्या केल्या आहेत. त्याच्यासाठी हा सिनेमा कदाचित एक नवा मार्ग ठरू शकतो, पण या विनोदी सिनेमाच्या पिचवर अनेक कलाकार जरी असले आणि एकूण करमणुकीत सगळ्यांचा थोडा बहुत हातभार असला तरी सिक्सर मारलीय ती अर्थात अनिल कपूरने. किंबहुना हा सिनेमा पाहायचं जर एकच कारण हवं असेल तर ते आहे अनिल कपूर. त्याने साकारलेला करतार सिंग कमालीचा आवडून जातो. अभिनेत्रींमध्ये इलियाना डिक्रूझने बऱ्यापैकी बाजी मारलीय. म्हणजे फक्त कचकड्याच्या बाहुलीसारखं दिसणं ही गरज पूर्ण करून त्यासोबत तिने अदाकारीही बऱ्यापैकी निभावली आहे. अथय्या शेट्टी मात्र तितकीशी प्रभाव पाडू शकली नाही. असो, पण त्याने करमणुकीला कुठे बाधा अशी येत नाही.

या सिनेमात खूप जास्त गाणी आहेत. करमणुकीच्या दृष्टीने ही गाणी बरी असली तरी नंतर नंतर कंटाळा यायला लागतो. अर्थात गाणी आहेत चांगली. कदाचित एफएमवर नुसती ऐकताना करमणूक होऊ शकेल, पण सिनेमात एकत्रपणे ती खूप जास्त होऊ लागतात.

सिनेमाचं छायांकनही चांगलं आहे. कॅमेऱ्याचा अतिशय छान वापर करण्यात आलाय. विशेषकरून लंडन आणि चंडिगढ ही दोन ठिकाणं त्यांच्या विशेषांसह कॅमेऱ्याच्या माध्यमातून अतिशय देखणी उभी राहतात. या सिनेमात खूप रंगांचा वापर आहे. ते रंगदेखील कॅमेऱ्याने सुरेख टिपले आहेत. एकूणच संगीत, संवाद, आणि छायांकन यामुळे सिनेमाला उत्साहाची हवीहवीशी झालर लाभली आहे यात काही वावगं नाही. एक फॅमिली टाइमपास म्हणून नेटकं असं दिग्दर्शन आणि सिनेमाची बांधणी या सिनेमातून वाट्याला येते.

यातले काही दृष्यं आणि संवाद कमालीची विनोदी असली आणि हसून हसून पोट दुखत असलं तरीही काही ठिकाणी मर्यादा राखायला हवी होती असंही वाटून जातं. विशेषकरून सरदारजीच्या विनोदात. उगाच विनोदाला विनोद म्हणून त्या गोष्टी खपूनही जात असल्या तरी कुठेतरी खटकतात. बाकी या सिनेमात विशेष काही हाती लागत नाही, पण करमणूकप्रधान बॉलीवूडचा ढाचा म्हणून तो अगदी फिट्ट बसतो. अशा मसाला सिनेमांची आपल्याला गरज असतेदेखील. सिंग इज किंग, नमस्ते लंडन, वेलकमसारखे तमाम सिनेमे आठवून बघा. या सिनेमांनी खूप करमणूक केली. तीच धाटणी हा सिनेमा चांगल्या पद्धतीने पुढे नेतो. याची लांबीरुंदी थोडी कमी असती तर अजून मजा असती. शेवटाकडे हा सिनेमा उगाच ताणला गेला आहे. सहज चाललेली विनोदाची आतषबाजी शेवटाकडे उगाच जास्त होते आणि थोडं अति वाटायला लागतं.

पण त्यामुळे रसग्रहणात विशेष फरक पडत नाही. थिएटरबाहेर पडताना आपल्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उमटतेच. थोडक्यात काय तर, कुटुंबासोबत टाइमपास म्हणून वीकेंड साजरा करायचा असेल तर ‘मुबारकाँ’ हा नक्कीच चांगला पर्याय असू शकतो.

दर्जा : ***
सिनेमा : मुबारकाँ
निर्माता : अश्विनी वर्दे, मुरड खेतानी, सुविदेश शिंगाडे
दिग्दर्शक : अनिश बझमी
लेखक : राजेश चावला
छायांकन : हिंमत धामजा
कलाकार : अनिल कपूर, अर्जून कपूर,इलियाना डिक्रूझ, अथय्या शेट्टी, नेहा शर्मा.