ठाण्याच्या कारागृहात अवतरली ‘ज्ञानगंगा’

सामना प्रतिनिधी । ठाणे

‘वाचाल तर वाचाल’ असे नेहमी म्हटले जाते. त्यास तुरुंगातील कैदीही अपवाद नाहीत. ठाणे कारागृहात तर ‘ज्ञानगंगा’ अवतरली असून दोन हजार पंधरा पुस्तकांची अनोखी भेट मिळाली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच उर्दू भाषेतील ही पुस्तके आहेत. कैद्यांना आपल्या आवडीची पुस्तके वाचण्याची संधी मिळणार आहे. ऐन दिवाळीत मिळालेल्या या भेटीमुळे कारागृहातील कैद्यांना वाचण्याचा आनंद लुटता येईल.

ऐतिहासिक वारसा असलेल्या ठाणे कारागृहामध्ये साडेतीन हजारांहून अधिक कैदी असून त्यांना वाचनाचा छंद जोपासता यावा म्हणून तुरुंग प्रशासन प्रयत्न करीत आहे. अनेक कैदी तर शिक्षा भोगत असतानाच पदवीचीही परीक्षा देतात. कैद्यांमध्ये वाचनसंस्कृती जपण्यासाठी तसेच त्यांचे मानसिक परिवर्तन व्हावे म्हणून हिंदुस्थानी प्रचार सभेने ठाणे कारागृहाला दोन हजार पुस्तकांची आज भेट दिली. तसेच पुस्तके ठेवण्यासाठी सहा लोखंडी कपाटेही दिली असून त्याचे उद्घाटन तुरुंग अधीक्षक एन.बी. वायचळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिवाळीनिमित्त कैद्यांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविले असून त्याचा शुभारंभ आजपासून करण्यात आला आहे.