दहावी नापास झालेले भामटे चालवतात मेडिकलची दुकाने

3

सामना प्रतिनिधी । ठाणे

शहरात जागोजागी थाटण्यात आलेल्या मेडिकल दुकानांमधून औषधे घेताना सावधान… डॉक्टरांनी प्रिस्क्रीप्शनमध्ये लिहून दिलेले औषधच तुमच्या हाती पडेल याची गॅरंटी नाही. कारण परराज्यातून जेमतेम दहावी, बारावी पास करणारे भामटे मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करत असल्याची धक्कादायक बाब ठाणे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. इतकेच नव्हे तर या भामटय़ांना डी फार्मसीचे बनावट प्रमाणपत्र देणाऱया संस्थेचा पर्दाफाशही केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ढोकाळीतील दीप पॅरामेडिकल ऑर्गनायजेशनच्या संचालकासह चौघा फार्मासिस्टला ताब्यात घेतले.

मेडिकल स्टोअर्स चालवण्यासाठी डी फार्म प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. मात्र ठाणे शहरासह परिसरातील काही मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मासिस्ट म्हणून काम करणारे कर्मचारीच बोगस असल्याचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेने केला आहे. त्यासाठी ढोकाळी येथे दीप पॅरामेडिकल ऑर्गनायजेशन या शिक्षण संस्थेत बनावट प्रमाणपत्राचा कारखानाच चालवला जात आहे. या संस्थेतून अजमेर, नवी दिल्ली येथील दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्र मिळवत होते. या प्रमाणपत्राच्या आधारे ते महाराष्ट्र स्टेट फार्मसी काऊन्सिलकडे नोंद करून मेडिकल चालवण्याचा परवाना घेत होते. या टोळीची कुणकुण लागताच ठाणे गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने शहरातील संशयीत मेडिकल्सवर पाळत ठेवली आणि मोठय़ा गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला.

  • पोलिसांनी धाड टाकून खोपट येथील आदर्श मेडिकल फार्मासिस्ट अरविंदकुमार भट, दिवा येथील जय मेडिकलचे राजू यादव, काल्हेर येथील सेंट्रल मेडिकलचे बुधाराम आजेनिया, मनोरमानगर येथील महावीर मेडिकलचे बलवंतसिंह चौहान यांना ताब्यात घेतले. तर त्यांना प्रमाणपत्र मिळवून देणाऱया ढोकाळी येथील दीप पॅरामेडिकल ऑर्गनायजेशन संस्थेचे संचालक पुरुषोत्तम ताहीलरामानी यालाही ताब्यात घेतले आहे.
  • त्यांच्याकडील डी फार्मसीचे प्रमाणपत्र नवी मुंबई येथील शिक्षण मंडळाकडे तपासणीसाठी पाठवले असता ते बोगस असल्याचे सिद्ध झाले.