धावत्या बसमध्ये टीव्ही प्रोग्राम, व्हिडीओ, गाणी फुकटात डाऊनलोड करा!

25


सामना प्रतिनिधी । ठाणे

टीएमटी प्रवाशांना धावत्या बसमध्ये आता मनोरंजनदेखील मिळणार आहे. त्यासाठी परिवहनच्या सर्व 467 बसेसमध्ये खास शुगर बॉक्स बसवणार असून त्याद्वारे टीव्ही प्रोग्राम, व्हिडीओ, गाणी फुकटात डाऊनलोड करता येणार आहेत. परिवहनमार्फत वायफाय सुविधा उपलब्ध करून देणार असून त्यासाठी प्रवाशांना एक छदामही मोजावा लागणार नाही. मनोरंजनाची ही अभिनव भेट लवकरच परिवहनमार्फत प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

सध्याच्या हायटेक युगात प्रत्येकाच्याच हातात मोबाईल असून बसमध्ये प्रवास करीत असताना एखादा चित्रपट किंवा गाणे डाऊनलोड करण्याची इच्छा झाल्यास शुगर बॉक्सद्वारे काही मिनिटांतच मोबाईलवर आपल्याला हवे असलेले मनोरंजन अनुभवता येणार आहे. प्रत्येक बसमध्ये ठेवण्यात येणाऱ्या शुगर बॉक्सचा पासवर्ड आपल्या मोबाईलमध्ये टाईप करून ही सुविधा घेता येईल. या यंत्रणेचे कंत्राट दिले जाणार असून डिजिटल ऍडव्हर्टायझिंगदेखील करता येणार आहे. त्या माध्यमातून परिवहन विभागाला सुमारे 94 लाख रुपये एवढे महसुली उत्पन्न मिळणार आहे. परिवहन सेवेच्या ताफ्यात सध्या 467 बसेस असून लवकरच तेजस्विनी योजनेंतर्गत 50 नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे बसेसची एकूण संख्या 517 एवढी होणार असून मनोरंजनाचा शुगर बॉक्स सर्व बसेसना बसविला जाणार आहे. यामुळे महसुली उत्पन्नात वाढ तर होईलच, पण प्रवाशांची संख्यादेखील वाढेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

वाहतूक नियंत्रक चौक्यांवरही सुविधा
मनोरंजनाची हायटेक सुविधा धावत्या बसेसबरोबरच परिवहनच्या वाहतूक नियंत्रक चौक्यांवरही उपलब्ध होणार आहे. परिवहनकडे सध्या 18 नियंत्रण कक्ष असून या कक्षामार्फत वॉच ठेवला जाणार आहे. महापालिकेच्या आगामी महासभेत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला असून त्यावर शिक्कामोर्तब होताच ही सुविधा सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या