युतीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार, ठाणे जिंकणारच!

सामना प्रतिनिधी। ठाणे

ठाणे लोकसभा मतदारसंघाला शिवसेना-भाजप युतीची तसेच विजयाची मोठी परंपरा असून आगामी निवडणुकीतही प्रचंड बहुमताने जिंकणारच, असा निर्धार शुक्रवारी कार्यकर्त्यांनी केला. विरोधकांनी पडेल उमेदवार समोर दिल्याने युतीचा विजय हा आणखी सोपा झाला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली.

यावेळी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख व सभागृहनेते नरेश म्हस्के यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. ठाण्याची जागा जिंकणारच, या निर्धाराने युतीचे कार्यकर्ते एकदिलाने प्रचार करतील, असा निश्चय यावेळी करण्यात आला.

शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी गेल्या पाच वर्षांत जलवाहतूक, रेल्वे स्थानकांवरील एफओबी, सरकते जीने यांसारखी अनेक विकासकामे मार्गी लावली. या कामांच्या जोरावरच निवडणूक जिंकू असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. प्रचारातदेखील युतीचे कार्यकर्ते एकत्र काम करणार आहेत.