Thank You विठ्ठला, सॉरी प्रेक्षक

वैष्णवी कानविंदे-पिंगे । मुंबई

कुठचे कुठचे सिनेमे बघून मन बधिर होतं. अस्वस्थ वाटतं. त्याच्या प्रभावाने मेंदूला झिणझिण्या येतात वगैरे वगैरे… खरंय! अशा अनेक कलाकृती सकस कलाकृती असतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. पण ज्याप्रमाणे चकाकतं ते सगळंच सोनं नसतं तसंच मनाला बधिर करणाऱ्या, झिणझिण्या आणणाऱ्या सगळय़ाच कलाकृतीही सकस नसतात. किंबहुना त्या आवर्जून विचार करायला भाग पाडतात की, आपण या सिनेमाला का आलो. उगाची डोकेदुखी ओढवून घेण्यापेक्षा अजून काही करणं सहज शक्य होतं तरीही आपण ही वाट का निवडली…

मंडळी, हे सगळं विश्लेषण करण्यामागचं नेमकं कारण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘थँक यू विठ्ठला.’ सुरुवातीची साडेतीन मिनिटं सरल्यानंतर हा सिनेमा पाहताना असह्य होतं. मुळात हा सिनेमा पाहताना अगदी सुरुवातीला जो विचार केला गेला असेल किंवा जी कल्पना सुचली असेल ती सुखी माणसाच्या सदऱयाची गोष्ट आजवर असंख्य वेळा वापरली गेली असली तरी तशी चांगली होती. सिनेमाच्या माध्यमासाठी अशा गोष्टी नेहमीच आपल्या सध्याच्या बिकट सांसारिक परिस्थितीला कंटाळलेला एक सामान्य माणूस. ज्याचा देवाच्या अस्तित्वावर फारसा विश्वास नाही. पण अचानक देव त्याच्या समोर मूर्त रूपात अवतरतो आणि त्याला ज्या माणसांचं आयुष्यं आकर्षक असतं त्यांचं आयुष्य जगायचं वरदान देतो… मग खरंच पैसे, सत्ता, शक्ती या गोष्टी समाधानापेक्षा महान असतात का, त्या असल्या तरच सुखी होता येतं का, अशा गोष्टींचा ऊहापोह करत हा सिनेमा पुढे सरतो आणि शेवटी एका निष्कर्षाला येऊन(असं दिग्दर्शकाला वाटते) शिकवण देऊन संपतो(एकदाचा).

पण हा जो काही त्या सामान्य माणसाचा असामान्य परकायाप्रवेश कमालीचा कंटाळवाणा आणि किटकिटणी आणणारा आहे. त्याची न जमून आलेली पटकथा, कमालीचे बोधपर (बोधाचा ओव्हरडोस) आणि कंटाळवाणे संवाद, न संपणारी विसंगत दृष्यं हे सगळं मध्यंतरापर्यंतही सहन होत नाही आणि मध्यंतरानंतर हे कधी संपणार आहे या विचारानेच मन अधिर व्हायला लागतं.

असो, तर या सिनेमात मुख्य भूमिका आहेत महेश मांजरेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या. मकरंदच्या संवादांमध्ये ढीगभर प्रचलित आणि स्वरचित म्हणींचा वापर आहे. सुरुवातीला त्या जरा बऱ्या वाटतात. पण नंतर त्याचा मारा सुरू झाला की ‘संवाद नको रे विठ्ठला पण म्हणी आवर’ अशी अवस्था होते. पटकथा आणि संकलनदेखील जेमतेमच. खूपच अघळपघळ आणि पसरट पटकथेला जर संयत दिग्दर्शनाची आणि नेमक्या संकलनाची कात्री लागली असती तर सिनेमा जरा तरी आटोक्यात आला असता. पण दुर्दैवाने तो समतोल साधताच आला नाहीय. म्हणजे विषय एका मुद्दय़ावर सुरू होतो आणि नंतर इतका वहावत गेलाय की त्याचा शेवट कसा आणि कोणत्या मुद्दय़ावर करावा याचाच विसर पडला गेलाय.

त्यात भर म्हणून की काय कलाकारांच्या कर्कश्श एकसुरी संवादांमुळे एकूण सिनेमाचा प्रवास नुसता कंटाळवाणाच वाटत नाही तरी कानाला त्रासदेखील व्हायला लागतो. यात प्रमुख दोन तीन पात्रांव्यतिरक्ति इतर असंख्य पात्रं आहे. या असंख्य पात्रातल्या प्रत्येकाचा अभिनय अगदीच सुमार म्हणावा इतका मूलभूत आहे. हातवारे करून बोलणं किंवा एखादी लकब घेऊन तसंच वागणं हे सगळंच खूप बिनबुडाचं. पण या इतर पात्रांचं सोडा, मुख्य कलाकारही प्रभाव पाडू शकत नाही.

या सगळय़ा प्रपंचाला मुंबईच्या डबेवाल्याच्या कथा आणि व्यथाचं कव्हर घातलंय. त्यात मोठय़ा उद्योजकाचं आयुष्य मांडलंय, राजकारण्याचं आयुष्यं मांडलंय. एवढंच नाही तर, देवाचेही व्यवहार दाखवले आहेत.. एवढं सगळं त्या अडीच तासांच्या सिनेमात म्हणजे जरा टू मच (मच मचच!) नाही का.? उद्योजकाचा भाग सरल्यावर नेत्याचा भाग सुरू होतोय असं कळतं आणि डोक्याला आठय़ा येतात. नंतर जेव्हा यमाचा भाग सुरू होतो तेव्हा तर हा मनस्ताप असह्य व्हायला होतो. यम आणि यमदूत, ब्रम्हदेव आदी देवादिदेवांचे पोषाख आणि एकूणच त्यांना ज्या पद्धतीने सादर केलंय ते पहाताना अरेरे! काय हे देवा असं काहीसं वाटून जातं. पोलीस, किंवा ऑफिसातला मॅनेजर, नेत्याचा मेव्हणा, उद्योजकाची बायको आणि मैत्रीण या सगळय़ाच व्यक्तिरेखा अतिशयोक्तीतल्या पण नाहीत आणि खऱया पण नाहीत. मधल्या मध्ये अधांतरी राखल्यामुळे त्या पटतच नाहीत आणि पटत नाहीत त्यामुळे झेपत नाहीत.

यातल्या गाण्यांविषयी थोडं बोलता येईल. जेव्हा सिनेमा सुरू होतो. तेव्हा वारीचं दृष्यं आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एक गाणं आहे. ते खरंच चांगलं आहे. ते पहाताना काहीतरी चांगलं बघायला मिळू शकेल अशी बारीकशी आशा मनात उमलते. सिनेमाचा सुरुवातीला डबेवाल्यांचा प्रपंच पाहताना कदाचित आपला अंदाज बरोबर ठरेल अशी शंका यायला लागते. पण अवघ्या काही क्षणांत तो शंकेचा फुगा फाटकन फुटतो आणि ज्या वेगाने ती आशा उमलते त्याच्या तिपटीने ती विरूनही जाते. नंतर या सिनेमात दोन आयटम गाणी आहेत. आजवर मराठी अशी अनेक गाणी आलीयत. कदाचित कुठेतरी लाऊडस्पीकरवर ती ऐकू येतीलही. पण खरं सांगायचं तर ती द्वय़र्थी आणि सुमार आहेत. या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर असं एखादं गाणं कदाचित खपून गेलं असतं पण दोन म्हणजे जरा जास्तच होतं. घसरत्या गाडीला दिलेल्या स्टेपनीसारखी ही गाणी सिनेमाला जराही वाचवत नाहीत. हा विषय शिताफीने जास्त संवादी न करता मांडता आला असता. विनोदी पद्धतीने गंभीर विषयाचं सखोल विवेचन सहज शक्य होतं. पण दुर्दैवाने तो संवादी कर्कश आणि वरवरचा झालाय. एकूणच न झेपणारा हा सिनेमा पहाण्यापेक्षा बऱ्याच बऱ्या गोष्टी करणं सहज शक्य आहे हे सांगणं सुज्ञास न लगे!

दर्जा             :  १ स्टार
सिनेमा          : थँक यू विठ्ठला
निर्माता         : गोवर्धन नारायण काळे, गौरव गोवर्धन काळे, अंजली सिंग
कथा/दिग्दर्शन/: देवेंद्र शिवाजी जाधव
पटकथा        : एम. सलीम
संवाद           : एम. सलीम आणि योगेश शिरसाट
संगीत           : रोहन रोहन
कलाकार       : महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, मौसमी तोंडवळकर, स्मिता शेवाळे, पूर्वी भावे, दीपक शिर्के