राज्यातील २६ पंतप्रधान सिंचन प्रकल्प वर्षअखेरीपर्यंत पूर्ण करणार

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील जलगतीने पूर्ण होणाऱ्या २६ प्रकल्पांचा पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेत समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून डिसेंबर २०१९ला हे प्रकल्प पूर्ण करून कार्यान्वित केले जाणार आहेत, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिली.

कोल्हापूर जिह्यातील प्रकल्पांची कामे अपूर्णावस्थेत असल्याबद्दल विधानसभा सदस्य संध्यादेवी देसाई-कुपेकर, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील-सरूडकर आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळाने धामणी धरणाच्या कामासाठी यांत्रिकी विभागाने मान्यता दिली होतीस, परंतु दोन वर्षे प्रयत्न केल्यानंतर ही कामे यांत्रिकी विभागाकडून करता येणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे या कामाच्या निविदा लवकरात लवकर काढून कामे केली जातील. पावसाळय़ापूर्वी या कामांचे उद्घाटन केले जाईल. तसेच राज्यपालांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसार पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेत २६ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात असून कोणत्याही परिस्थितीत ही कामे डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करून कार्यान्वित केले जातील.

सरकारी प्रकल्पांसाठी वाळूची अडचण

राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी कठोर नियम केले आहेत. त्यामुळे सरकारी प्रकल्पांच्या कामासाठी वाळू मिळणे अडचणीचे ठरत आहे. मोठय़ा प्रमाणात वाळू लागणार असल्यामुळे त्याकरिता धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.