विदर्भाच्या रणजी जेतेपदात प्रशिक्षक पंडीत यांच्या कडक शिस्तीचा सिंहाचा वाटा

48

सामना प्रतिनिधी, नागपूर

विदर्भाने सौराष्ट्रावर अंतिम फेरीत मात करून सलग दुसऱयांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱया विदर्भाने स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. कडक शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱया चंद्रकांत पंडीत यांनी संघाची घडी बसविण्यासाठी काही कडक नियम आखले होते. तेच नियम आणि प्रशिक्षक पंडित यांची शिस्त विदर्भाच्या जेतेपदप्राप्तीला लाभदायक ठरली अशा शब्दांत कर्णधार फैज फजलनेच विदर्भाच्या अपूर्व यशाचे रहस्य उलघडले आहे.

एका नो बॉलला 500 तर नो बॉलवर विकेट घेतल्यास 1 हजार रुपये दंड
आपल्या गोलंदाजांना शिस्त लागावी यासाठी चंद्रकांत पंडीत यांनी सामन्यात नो बॉल टाकणाऱया गोलंदाजांना 500 रुपयांचा दंड ठेवला होता. याचसोबत जो गोलंदाज सामन्यात नो बॉलवर विकेट घेईल त्याला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागायचा.पंडित यांच्या या शिस्तीनेच विदर्भाचे गोलंदाज अधिक कणखर बनले असेही फैजने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या