कर्जमाफी फक्त पाच हजार कोटींचीच

सामना प्रतिनिधी, नांदेड/परभणी

शेतकऱ्यांना ३३ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले म्हणून ‘मार्केटिंग’ चालू आहे. प्रत्यक्षात मात्र पाच हजार कोटी रुपयांचीसुद्धा कर्जमाफी केली नाही, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. केंद्र व राज्यातील भाजप सरकार जनतेला फक्त फसवण्याचेच काम करत आहे. उद्योगपतींवर मेहेरबान असलेले हे सरकार दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांची मात्र कर्जमाफीच्या नावावर क्रूर थट्टा करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.

नांदेड व परभणी येथे आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड येथे काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. गेल्या तीन वर्षांत नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण ना केंद्रातल्या ना राज्यातल्या सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा आला. पण हेच सरकार उद्योगपतींवर मात्र मेहेरबान आहे. गुजरातमध्ये टाटा उद्योगसमूहाला विनाअट ६५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची या सरकारने फसवणूक केल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. नोटाबंदी करून सरकारने कोणता दहशतवाद संपवला, असा सवालही राहुल गांधी यांनी केला.

सरकारच्या घोषणा खोट्या
परभणी येथे काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या घोषणा खोट्या असल्याचा आरोप केला. १५ लाख देण्याची घोषणा, स्वीस बँकेतून काळे धन देशात आणण्याची ग्वाही, महागाई कमी करण्याची हमी, दरवर्षाला दोन कोटी रोजगार या घोषणांचे काय झाले? असा सवालही त्यांनी केला. हे सरकार फक्त देशातील बडय़ा ५० उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसच्या दबावामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला असा दावाही राहुल गांधी यांनी केला.