‘द इकॉनॉमिस्ट’चा हल्लाबोल; नोटाबंदीचे झाले तेच ‘जीएसटी’चे होणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नोटाबंदीप्रमाणेच ‘जीएसटी’चा निर्णय अपयशी आणि विकासाला खीळ घालणारे आहेत. त्यामुळे नोटाबंदीमुळे जे झाले तेच ‘जीएसटी’मुळे होणार असा सावधानतेचा अप्रत्यक्ष इशाराच जगप्रसिद्ध ‘द इकॉनॉमिस्ट’ या मासिकाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिसतात तेवढे सुधारणावादी नाहीत. अंध राष्ट्रवादी आणि व्यक्तिपूजेचे केंद्र बनले आहेत असा हल्लाबोलही या मासिकात करण्यात आला आहे.

‘द इकॉनॉमिस्ट’ हे जगातील महत्त्वाचे व्यापार आणि आर्थिक घडामोडींसाठीचे प्रसिद्ध मासिक आहे. त्यामुळे वस्तू आणि सेवाकराची अर्थात जीएसटीची १ जुलैपासून अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने वाजतगाजत तयारी केली असतानाच जीएसटीची वाटचाल नोटाबंदीसारखी होणार असा इशारा ‘द इकॉनॉमिस्ट’ने दिल्यामुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

२०१९ निवडणुकीसाठी व्यक्तिपूजेचे नवे धोरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटतात तेवढे सुधारणावादी नाहीत. ते अंध राष्ट्रवादी वाटत आहेत. स्तुतीप्रिय व्यक्तिपूजेचे केंद्र बनले आहेत. २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी ‘व्यक्तिपूजा’ हे नवे धोरण पंतप्रधान मोदी राबवू शकतात असा हल्लाबोल या मासिकाने केला आहे.

ताशेरे… प्रश्नचिन्ह
– ‘द इकॉनॉमिस्ट’ने पंतप्रधान मोदी यांच्या धोरणानंतर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करून अनेक ताशेरे ओढले आहेत.
– पंतप्रधान मोदींकडे प्रचंड बहुमताचे सरकार आहे तर विरोधी पक्ष प्रभावहीन आणि काळहीन आहे. अशा परिस्थितीत आर्थिक सुधारणा करण्याची, विकास करण्याची सुवर्णसंधी मोदींकडे होती परंतु त्यांनी ही संधी गमावली आहे.
– नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका हिंदुस्थानच्या आर्थिक विकासाला बसला. नोटाबंदीमुळे प्रामाणिक व्यावसायिकांना त्रास झाला पण काळा पैसा असणाऱ्यांना त्रास झाला नाही. काळाबाजार करणाऱ्यांना नोटाबंदीचा फटका बसला नाही. जीएसटीही अकारण जटिल कायदा आहे. हा कायदा लालफितीचा आहे.
– माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यापेक्षा पंतप्रधान मोदी जास्त उत्साही आहेत, पण कोणतीही मोठी योजना ते तीन वर्षांत घेऊन आले नाहीत.

मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका वाघाच्या पाठीवर स्वार झाले आहेत असे दाखविण्यात आले आहे. पण हा वाघ खरा नसून कागदी वाघ आहे. एका तलावावरून उडी मारतानाच हा कागदी वाघ फाटला आहे, असेही दाखविण्यात आले आहे.