प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग, बदनामीच्या भीतीने तरुणीने घेतला गळफास

सामना प्रतिनिधी । ठाणे

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर प्रेमसंबंधाचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची धमकी देत २० लाख उकळले… तरीही रोज पैशांसाठी धमकी मिळत असल्याने बदनामीच्या भीतीने अखेर एका युवतीने गळफास लावून मृत्यूला कवटाळले. ही घटना ठाण्याच्या राबोडी भागातील साकेत येथे घडली असून पोलीस आरोपी प्रियकर अमीन मन्सुरी याचा शोध घेत आहेत.

मुंब्य्राच्या अमृतनगर येथे राहणारा आरोपी अमीन मन्सुरी याचे पालघर येथे राहणाऱ्या एका युवतीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आईवडिलांचा तलाक झाल्यानंतर ही युवती आईसोबत पालघर येथे राहत होती. वडिलांचा ट्रान्सपोर्टेशनचा धंदा असल्यामुळे ते पोटगी म्हणून दर महिना ५० ते ६० हजार रुपये देत होते. त्यातूनच १० हजारांचा पॉकेटमनी तिला मिळत असे. या पैशांवर अमीनचा डोळा असल्याने त्याने प्रेमाचे नाटक करून तिच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर हे फोटे इस्टाग्रामवर अपलोड करून बदनामी करण्याची धमकी देत सुमारे २० लाख रुपये उकळले. मात्र इतके पैसे हडप करूनही त्याने ब्लॅकमेलिंग सुरूच ठेवली. २६ डिसेंबरला ही युवती आपल्या वडिलांकडे साकेत येथे राहायला आली होती. त्यावेळी तिचे व अमीनचे फोनवर भांडण झाले व तिने बेडरुमचा दरवाजा बंद करून गळफास घेतला असे तिच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार राबोडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अमीनवर गुन्हा दाखल केला आहे.