सेनादल, हिंदुस्थानी रेल्वे चॅम्पियन; आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव

सामना प्रतिनिधी । मुंबई

जोगेश्वरीतील एसआरपीएफ मैदानावर गेले चार दिवस सुरू असलेल्या ‘फेडरेशन कप’ कबड्डी स्पर्धेचा अंतिम दिवस सेनादल व हिंदुस्थानी रेल्वे या संघांनी गाजवला. पुरुष गटात सेनादलने कर्नाटकचे आव्हान २८-२५ अशा फरकाने मोडून काढत चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला, तर महिला गटात हिंदुस्थानी रेल्वेने हिमाचल प्रदेशवर २६-२५ असा अवघा एका गुणाने सनसनाटी विजय मिळवत अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शिवसेना नेते, खासदार आनंदराव अडसूळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री रवींद्र वायकर, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू, विभागप्रमुख, आमदार ऍड. अनिल परब, हिंदुस्थानचा माजी हॉकी कर्णधार धनराज पिल्ले, स्थानिक लोकाधिकार महासंघाचे प्रदीप मयेकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ता पाथरीकर, सचिव आस्वाद पाटील, गुरुनाथ खोत यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला.

army-indian-railways-champ

– कबड्डीपटू, क्रीडाप्रेमी आयोजनावर खूश
फेडरेशन कपसारख्या राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केल्यामुळे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे गजानन कीर्तिकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व संघांतील कबड्डीपटूंसह क्रीडाप्रेमींनीही यशस्वी आयोजनासाठी तोंडभरून स्तुती केली.

– राष्ट्रीय चॅम्पियन महाराष्ट्र उपांत्य फेरीत गारद
अकरा वर्षांनंतर राष्ट्रीय चॅम्पियन बनणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाचे अंतिम फेरीत पोहोचून जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंग पावले. कर्नाटकने उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्राला ३९-३१ असे पराभूत करीत फायनलमध्ये प्रवेश केला. तसेच महिनाभरापूर्वी हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला. महाराष्ट्राच्या रिशांकने पहिला बोनस गुण घेत संघाचे खाते उघडले, पण हे समाधान फार काळ टिकले नाही. कर्नाटकने १५व्या मिनिटाला पहिला लोण देत १८-१० अशी आघाडी घेतली. विश्रांतीला २२-१५अशी कर्नाटककडे आघाडी होती. उत्तरार्धात आणखी एक लोण देत आपली आघाडी कर्नाटकने वाढविली. दुसऱया उपांत्य फेरीच्या सामन्यात सेनादलाने हरयाणाचा कडवा प्रतिकार ३८-३१ असा मोडून काढीत फायनलमध्ये एण्ट्री मारली. दरम्यान, महिलांच्या उपांत्य सामन्यात राष्ट्रीय विजेत्या हिमाचलने हरयाणाला ३६-२९असे, तर हिंदुस्थानी रेल्वेने पंजाबला ३८-३१ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली.