म्यानमारचा पवित्र पॅगोडा


म्यानमारमध्ये ‘गोल्डन रॉक’ हा बौद्धधर्मीयांसाठी फार मोठे श्रद्धास्थान आहे. कोणत्याही धार्मिक स्थळी भाविकांची जी गर्दी पाहायला मिळते तशीच येथेही तोबा गर्दी उसळलेली असते. या ठिकाणी पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत बुद्धिस्ट भाविक येथे मोठय़ा संख्येने येतात. हे शिवालय सोन्याचे असल्याचे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार हा गोल्डन रॉक बुद्धांच्या माथ्यावर ठेवण्यात आले होते. या पवित्र स्थळी वर्षातून तीनवेळा भेट देणाऱ्या भाविकाच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं.

म्यानमारमध्ये अनेक प्रकारचे असंख्य पॅगोडा आहेत. पण येथेच एक पॅगोडा असाही आहे जो सोन्याच्या रंगाचा आहे. त्याला ‘गोल्डन रॉक’ असं नाव असले तरी त्याला ‘शिवालय’ही म्हटलं जातं. या सोन्याच्या पॅगोडामध्ये गुरुत्वाकर्षण आहे. ते एक आगळेवेगळे स्मारक आहे. त्यामुळे बर्मामधील बुद्धिस्ट लोक तेथे मोठय़ा भक्तीभावाने दर्शनासाठी येत असतात.

या गोल्डन रॉकची उंची 25 फूट असून दोन दगड एकमेकांवर ठेवलेले आहेत असा भास होतो. हा भलामोठा पत्थर पहाडाच्या एका बाजूला किनाऱ्याला कुठल्याच आधाराशिवाय उभा आहे. स्थानिक लोक या स्मारकाला पवित्र मानतात. त्यामुळे येथे पूजाअर्चा करणाऱ्या शेकडो माणसांची नेहमीच गर्दी असते. हा दगड पाहून असं वाटतं की वरचा दगड कधीही खाली पडेल. परंतु वर्षांनुवर्षे तो दगड जसाच्या तसा उभा आहे.