
आपल्या शरीरातील अन्नपचन करणारे ‘पित्त’ योग्य मार्गाने आतडय़ात न जाता ते रक्तात मिसळण्यास सुरुवात होते तेव्हा कावीळ हा आजार होतो.
कावीळ बहुधा विषाणूंमुळे (एसीडीई) होते. यालाच इन्फेक्टिव्ह हिपॅटायटिस असे म्हणतात. दूषित अन्न व पाणी हेच याचे प्रमुख कारण असते. आयुर्वेदानुसार कावीळ हा पित्तदोषामुळे होणारा विकार आहे. तिखट, तेलकट व उष्ण पदार्थ, अल्कोहोल व कॅफेन या पदार्थांमुळे पित्त आणखी वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे पित्तनलिकेमध्ये अडथळा येतो व पित्त रक्तप्रवाहामध्ये साचू लागल्याने डोळे व त्वचा पिवळसर दिसू लागतात. दिवसा झोप येणे, सतत थकल्यासारखे वाटणे, राग, ताणतणाव आणि चिंता हीदेखील कावीळ होण्यामागची कारणे आहेत.
काविळीची काही लक्षणे
> डोळे, त्वचा, जीभ व लघवी पिवळ्या रंगाची होणे.
> भूक मंदावणे
> पोटाच्या वरील भागात वेदना
> प्रचंड थकवा
> बद्धकोष्ठता
> मळमळ व उलटय़ा होणे
> त्वचेला खाज सुटणे
> अंग मोडून जाणे
> ताप येणे
हे टाळावे
> उन्हात फिरणे टाळावे.
> कावीळ झालेल्या व्यक्तीने काजू, बदाम, खोबरे, तळलेले तसेच मसालेदार तिखट पदार्थ त्याचप्रमाणे पचायला जड पदार्थ वर्ज्य करावेत.
> उघडय़ावरचे अन्न खाणंही कटाक्षाने टाळावे.
> दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच मांसाहार पूर्णतः वर्ज्य करावा.
> पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्णासारखे उपाय करावेत.
> मद्यपान पूर्णतः टाळावे. पाणी उकळून थंड करूनच प्यावे.
> मसाले, मिरची, तेल, तूप, मांसाहार टाळावा.
> उकळून गार केलेले पाणी आणि फळांचा समावेश असावा.
काळजी
> एका लहान बाटलीत किंवा झाकणात लघवी घ्यायची. त्यात कापूर बुडवायचा. कापराचा रंग पिवळसर झाल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवून योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.
> कावीळ झाली असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या आहारात बदल करावा.
> औषधोपचारांबरोबर पथ्य पाळणेही तितकेच महत्त्वाचे असते.
> कावीळ झालेल्या रुग्णाची सुमारे पंधरा दिवस ते महिनाभर काळजी घेणे गरजेचे असते.
> रुग्णाने जास्त झोपून राहू नये.
हे खावे
> कावीळ झालेल्या लहान मुलांना काळ्या मनुकांचे पाणी आणि प्रौढ व्यक्तींना पाण्यात भिजवलेले काळ्या मनुका खाण्यास द्याव्यात.
> लाह्या, उकडलेल्या ताज्या भाज्या, तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी, पालक-टोमॅटो-दुधी सूप, भीडी पेज, मध्यम पिकलेली केळी यांसारखे पदार्थ आहारात असावेत.
> ज्वारी, नाचणी, राजगिरा, ओटस् या तृणधान्यांसोबत मुगडाळ, ताक अशी प्रथिने आहारात असावीत.
> ऊस चावून खावा.
> गोड आणि ताजे ताक दिवसातून दोनवेळा प्यावे.
> गूळ पाण्यात उकळवून गाळून प्यावा.