दुचाकीवर उडी घेऊन बिबट्याने केला थरारक पाठलाग!

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । देवरुख

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील घाटीवळे गावात मासेमारी करुन परतणाऱ्या दुचाकीस्वारांवर बिबट्याने जीवघेणी झडप घातली. सुदैवाने बिबट्याची झेप चुकली मात्र पुढे पाच मिनीटे त्याने दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. केवळ दुचाकीच्या धुरामुळे त्यांचे प्राण वाचू शकले .

रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर घाटीवळे काजळी नदीवर देवरुख बागवाडी मधील शिवदास देवजी गजबार, सुभाष भिवा गजबार आणि प्रकाश दामोदर साबळे हे तिघे मासेमारीसाठी गेले होते. सकाळी ८:३० च्या सुमारास घाटीवळे घाट रस्त्यातून देवरुखकडे निघाले असताना अचानक पुढील दुचाकीवर असणाऱ्या शिवदास गजबार यांच्यावर बिबट्याने झडप घातली. बिबट्याची झेप दुचाकीवर बांधलेल्या कॅन आणि माशांच्या परडीपर्यंतच पोहचली. त्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने शिवदासचा पाठलाग सोडला मात्र, सुभाष आणि प्रकाश यांचा पाठलाग सुरू केला .

घाट रस्त्यातील चढावामुळे दुचाकी वेगात चालवता येत नव्हती. बिबट्या कधी उजव्या तर कधी डाव्या बाजूने रस्त्यावर पंजे आपटत पाठलाग करत होता. अखेर एका अवघड वळणावर दुचाकीचा गिअर बदलतांना गाडी रेस झाली आणि मागे मोठा धूर झाला. हा धूर डोळ्यात गेल्याने बिबट्याने पाठलाग थांबवला आणि तो रानात निघून गेला. अर्धा तास आधी याच रस्त्याने शाळा – कनिष्ठ महाविद्यालयाची मुले चालत गेली त्यांच्या बाबतीत असा प्रकार न घडल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास टाकला. वनविभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी चाफवली, घाटीवळे ग्रामस्थांसह हा गंभीर प्रसंग ओढवलेल्या शिवदास गजबार, सुभाष गजबार आणि प्रकाश साबळे यांनी केली आहे .