जालन्यात महिलेचा निर्घृण खून

सामना प्रतिनिधी । जालना

मेडिकलमधून औषध घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या रेखा अशोक पवार(२५) या महिलेचे गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मंठा चौफुली परिसरात प्रेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. सदर महिलेचा धारदार शस्त्राने गळा कापून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे, तसेच खुनानंतर या महिलेला ओळखले जाऊ नये म्हणून अ‍ॅसिड टाकून चेहरा विद्रूप करण्यात आला आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, रेखा पवार ही महिला पतीशी भांडण झाल्यामुळे आपल्या आई-वडिलांकडे मंठा चौफुली परिसरातील पुष्पकनगरात रहात होती. ती एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणनूही काम करत होती. सततच्या भांडणामुळे तिने वर्षभरापूर्वीच पतीविरुध्द पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पतीविरुध्द गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर ती माहेरीच रहात होती.

दरम्यान, बुधवार ३१ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास रेखा ही मेडिकलमधून औषध घेऊन येते असे सांगून घराबाहेर पडली. बराचवेळी होऊनही मुलगी घरी परत आली नाही म्हणून आईने परिसरात शोधाशोध केली. परंतु ती आढळून न आल्याने आईने अखेर तालुका पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. दरम्यान, गुरुवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गायब झालेल्या या महिलेचा मंठा चौफुली परिसरातच एका शाळेजवळ मृतदेह आढळून आला. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांच्या पथकाने याच परिसरातून दिलीप मिसाळ, रा. पुष्पकनगर या संशयितास रात्री उशीरा अटक केली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सदरील मृत महिलेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.