कुपोषित मुलांची संख्या वाढली; जिल्ह्यात १८ मुले कुपोषित

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

कुपोषित बालकांची संख्या रोखण्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला बालकल्याण विभागाला अपयश आले आहे. कुपोषित बालकांची संख्या ऑक्टोबर महिना अखेरीस २५ वरुन १४ वर आलेली असताना डिसेंबर महिना अखेरीस ती संख्या पुन्हा १८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत चारने भर पडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरुवातीला कुपोषित बालकांची संख्या २५ वर पोहाचली होती. विविध उपाययोजना राबवून ही संख्या ऑक्टोबर २०१७ पर्यंत १४ वर आली. १४ कुपोषित बालकांची संख्या असताना मार्च अखेरीपर्यंत जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचे ध्येय महिला बालकल्याण विभागाला देण्यात आले. कुपोषणमुक्त बालकांची संख्या कंमी होण्याऐवजी ती आणखी चारने वाढली. त्यामुळे महिला बालकल्याण विभागासमोर आता आव्हान उभे राहिले आहे. दाभोळमध्ये २, खेडमध्ये १, गुहागरमध्ये २, संगमेश्वरमध्ये २, रत्नागिरीमध्ये ३, लांजामध्ये १, राजापूरमध्ये ४ मुले कुपोषित सापडली आहेत.

ग्राम बाल विकास केंद्र स्थापणार
कुपोषित मुलांची संख्या कमी करण्यासाठी महिला बालकल्याण विभागाकडून दिवसाला २० रुपये त्यांना पोषण आहार देण्यासाठी खर्च केले जातात. त्यामध्ये अंडे, दूध आणि अन्य खाद्यवस्तू दिल्या जातात. कुपोषित मुलांच्या वाढत्या संख्येकडे लक्ष देऊन आवश्यक त्या ठिकाणी बालविकास केंद्र स्थापन करण्यात येणार असून या केंद्रांच्या माध्यमातून ३० दिवस वैद्यकिय आधकारि यांच्या देखरेखीखाली कुपोषित मुलांवर उपचार केले जाणार आहेत.