गोरेगावमध्ये वृद्धेची घरात घुसून हत्या


सामना प्रतिनिधी । मुंबई

गोरेगाव येथील मीठानगरमध्ये राहणाऱ्या मिरुबेन पटेल (७५) या वृद्धेची दिवसाढवळ्या घरात घुसून हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या उद्देश की यामागे अन्य काही कारण आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

गोरेगाव येथील मिठानगरच्या गावदेवी सोसायटीमध्ये मिरुबेन आपल्या मुलासोबत राहत होत्या. बुधवारी सकाळी मुलगा कामावर निघून गेल्यावर त्या एकट्याच घरी होत्या. मुलगा सायंकाळी घरी परतला त्यावेळी दरवाजाला बाहेरून कडी लावलेली होती. कडी खोलून तो आत गेल्या त्यावेळी मिरुबेन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले.

गावदेवी सोसायटीशेजारीच मिरुबेन यांची विवाहित मुलगी राहते. जावयाने दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त असल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यातच मिरुबेन यांच्या मुलाने घरात रेणुका देवीची स्थापना केली होती. त्यामुळे घरात किन्नरांची ये-जा असायची. या बाजूनेही पोलीस आणि क्राइम ब्रँचचे अधिकारी तपास करीत आहेत.